जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज मंगळवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्या रतन किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली हे तपास पथक सकाळी 10 वाजता महाविद्यालयात दाखल झाले. या कारवाईमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. पथक अचानक दाखल झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भंबेरी उडाली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या दालनात पथकाने विविध बाबींची चौकशी केली. तब्बल 9 तास पथकाने ही चौकशी केली. रात्री 7 वाजेपर्यंत चाललेल्या या तपासात बांधकाम व्यवहारातील टीडीएस कपात शासकीय नियमांनुसार झाली आहे का ? याबाबत खात्री करण्यात करण्यात आली.
चिंचोली वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम तपासणीच्या कक्षेत
तपासणी दरम्यान चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाशी संबंधित कार्यादेश, खरेदी बिले, शासनाकडून मिळालेला निधी आणि त्याचे नियोजन यावरही अधिकाऱ्यांनी बारकाईने तपास केला. वैद्यकीय बिले, जमा-खर्च यांचा आढावा घेऊन नियमांमध्ये कोणतेही उल्लंघन झाले आहे का, याचा शोध घेतला गेला.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
या कारवाईदरम्यान, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, चौकशीत कुठल्याही प्रकारची अनधिकृत किंवा गैरव्यवहार अद्याप तरी समोर आलेला नाही. असे असले तरी शासकीय निधीच्या वापराबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या दृष्टीने आयकर पथक तपास करत आहेत.
महाविद्यालयातील आर्थिक व्यवहार पारदर्शक आहेत का?
वैद्यकीय महाविद्यालयास मिळालेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे करण्यात आला का, त्यातील आर्थिक नियमांचे पालन झाले का, याचा तपास करण्यात आला. शासकीय निधीच्या वापरात कोणतेही गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
कारवाईमुळे चर्चा रंगली
या तपासामुळे वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली असून, कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या तपासामुळे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी यंत्रणा अधिक सतर्क होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आयकर विभागाच्या या चौकशीचे अधिकृत निष्कर्ष लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.