तरुण भारत लाईव्ह । १२ जानेवारी २०२३। राज्यासह जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न होत असतानाही त्यात यश आलेले नाही. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2022 दरम्यान 843 रस्ते अपघातात 505 मृत्यू झाले असून 406 जण किरकोळ जखमींसह 105 गंभीर जखमींची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये रस्ते अपघातात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस, परिवहन आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दर वर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेदरम्यान वाहनचालकांसह सामान्य नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शनदेखील केले जाते. असे असूनही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नसून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
महामार्गासह उपरस्त्यांवर वाढते अपघात
गेली 12-13 वर्षे नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे काम रखडले होते. या महामार्गासह जिल्हास्तरावरून जळगाव पाचोरा राज्यमार्ग 158, औरंगाबाद तसेच अन्य राज्यमार्गांचे हस्तांतरण नॅशनल हायवे अॅथॉरीटीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पाचोरा मनमाड मार्ग पूर्ण झाला आहे. असे असले तरी बर्याच ठिकाणी रस्ते विस्तारीकरण, काँक्रिटीकरण अपूर्ण आहे.
सर्वात जास्त अपघात एप्रिल आणि मे महिन्यात
सर्वात जास्त अपघात एप्रिल 115, मे 103, नोव्हेंबर 102 आणि त्या खालोखाल जानेवारी महिन्यात 97 असे आहे. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यानची आकडेवारी पाहता 843 अपघात 505 मृत्यू, 105 गंभीर जखमींसह 406 किरकोळ जखमी अशी आकडेवारी पहाता सरासरी दर महिन्यास 70 अपघातांसह 46 मृत्यू तसेच जखमी होण्याचे प्रमाण भयावह आहे.
अपघातांची कारणे
रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करण्यासह वेगावर नियंत्रण नसणे, ओव्हरटेक करताना, सीट बेल्टस नसणे, हेल्मेटचा वापर नसणे, विरूद्ध दिशेने जाणे, टायरमधील हवेचे प्रमाण यासह अति आत्मविश्वास तसेच लहान मोठ्या वाहनांचे प्रखर हेडलाईटस आदी कारणांमुळे अपघात झाले आहेत.
जिल्ह्यांतर्गत रस्ते सुरक्षा समितीवर प्रश्नचिन्ह
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष, सदस्य सचिवासह अन्य सदस्य नियुक्तीसाठी शासनाने रस्ते सुरक्षा समिती पुनर्गठन करण्याचे आदेश 5 डिसेंबर 2022 रोजी काढले. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता या समितीचे सदस्य सचीव असल्याची माहिती दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्रशासनाकडे माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु कोणत्याही विभागाकडून समर्पक उत्तर मिळू शकले नाही.
जिल्हा स्तरावर अपघात नियंत्रणासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीत 13 मे 2015 रोजीच्या अधिसूचनेनुसार समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्त व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव होते. परंतु शासनाने 5 डिसेंबर 2022 रोजी समितीचे पुनर्गठन करण्यासाठी सुधारित अध्यादेश काढत त्यात अध्यक्ष जिल्हाधिकारी तर, सदस्य सचिव राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा रस्त्यांचे महामार्ग प्रशासनाला केले आहे.
अपघातांची आकडेवारी भीषणच
जळगाव शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील अन्य रस्त्यांवर जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 843 रस्ते अपघातात 505 जणांचा मृत्यू, 105 जण गंभीर तर 406 नागरिक किरकोळ जखमी झाल्याची नोंद आहे. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान दुचाकी वा चारचाकी लहान मोठ्या वाहनांच्या 843 अपघातांची नोंद असून मृत्यूसंख्येसह गंभीर आणि किरकोळ जखमींची संख्या 1016 पर्यंत आहे. यात महिन्याला 77 अपघातात 46 जणांचा मृत्यू तर 36 जण जखमी लहान मोठ्या वाहनांच्या अपघातात जखमी आणि मृतांची आकडेवारी पाहिल्यास अंगावर शहारे आणणारी आहे.