---Advertisement---
जळगाव : जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिसून येत आहे. अशातच किराणा दुकानात चहा मसाल्याची पुडी घेण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांनी दुकानमालक महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओढून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील निवृत्ती नगर परिसरात पुंडलिक पाटील यांचे घराला लागूनच किराणा दुकान आहे. दरम्यान, १४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते घरात गेले व त्यांच्या पत्नी प्रमिला पाटील दुकानात थांबल्या होत्या. त्यावेळी दोन जण दुचाकीने आले व त्यांनी चहा मसाल्याची पुडी घेतली. त्यांना पैसे परत देण्यासाठी पाटील खाली वाकल्या असता त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनपोत ओढून दोघे जण पसार झाले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव शहरात चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दुकाने, घरे तसेच रस्त्यावरून जाणाऱ्यांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्वरित योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोणत्या उपाययोजनांची गरज
१ ) पोलीस पेट्रोलिंग वाढवणे.
२ ) सीसीटीव्ही कॅमेरे जास्तीत जास्त ठिकाणी बसवणे.
३ ) महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणे.
४ ) समित्यांमार्फत गस्त व जनजागृती
---Advertisement---