---Advertisement---
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर टोकाला गेलेले भारत-चीनमधील संबंध सुधारण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या दौन्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. व्यापार, पर्यटन वाढीसह खनिजांच्या निर्यातीतील अडथळे दूर करून दोन्ही देशांत सहकार्य वाढविण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली.
शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी बीजिंग दौऱ्यावर असताना एस. जयशंकर यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, भारत-चीन संबंधाला व्यापक स्तरावर नेण्यासाठी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधील परस्पर संवाद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
बैठकीत व्यापाराचा विस्तार, पर्यटनाला चालना देण्यासाठी करार आणि खनिजांच्या निर्यातीतील अडथळे दूर करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांनी उपरोक्त क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर एकमत दर्शविले. गेल्या नऊ महिन्यांत चीनसोबतचे संबंध सामान्य करण्याच्या दिशेने चांगली प्रगती झाली.
दोन्ही देशातील सीमेशी संबंधित इतर मुद्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि यासंदर्भात लष्करी स्तरावर चर्चा पुढे नेण्यावर जिनपिंग यांच्यासोबत चर्चा झाली. व्यापारात अडथळे दूर करणे आणि महत्त्वाच्या खनिजांवर निर्यातीवर लादलेले निर्बंध उठविण्याचे आवाहन त्यांना करण्यात आल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
स्पर्धा हवी, संघर्ष नको
एस. जयशंकर यांनी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी आणि उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांच्यासोबत चर्चा केली. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, भारत आणि चीनदरम्यान द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी प्रगती करणे आवश्यक आहे. मतभेदाचे रूपांतर वादात नको आणि स्पर्धेचे रूपांतर संघर्षात नको, अशी भूमिका दोन्ही नेत्यांसमोर मांडली. सीमेवरील सैन्याची तैनाती कमी करण्यावरही चर्चा केली.
पंतप्रधान-राष्ट्रपतींना शुभेच्छा
एस. जयशंकर यांनी ही बैठक भारत-चीन संबंधांसाठी महत्त्वाची असल्याचे वर्णन केले आहे. त्यांनी ट्रिटमध्ये पुढे म्हटले की, भेटीदरम्यान शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. मी त्यांना आमच्या द्विपक्षीय संबंधांमधील अलीकडच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. भारत नेतृत्व स्तरावर संवाद खूप महत्त्वाचा मानतो आणि त्या दिशेने पुढे जात असल्याची माहिती यावेळी जिनपिंग यांना दिली.