‘चिकन नेक’ जवळ भारताने उभारल्या तीन नव्या चौक्या, शत्रूची प्रत्येक चाल होणार निष्फळ

---Advertisement---

 

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेली राजकीय हितसंबंधांची समिकरणं तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेली जवळीक यामुळे भारतासाठी आपल्या ईशान्य भागातील सुरक्षेवर अधिक लक्ष ठेवणं आवश्यक बनलं आहे. त्यातही देशाच्या इतर भागाला ईशान्य भारताशी जोडणाऱ्या आणि चिकन नेक अशी ओळख असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने या भागात तीन नव्या चौक्या उभ्या केल्या आहेत.

बांगलादेश आणि चीनची या भूभागावर वाकडी नजर आहे. सिलिगुडी कॉरिडोरला लागून असलेल्या या निमुळत्या पट्टीची लांबी ६० किलोमीटर असून रुंदी ही काही ठिकाणी २२ किलोमीटर एवढी आहे. या ‘चिकन नेक’ला लागूनच बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि चीनच्या सीमा आहेत. सामरिकदृष्टया ही चिंचोळी पट्टी अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील असल्याने बांगलादेशचा या भूभागावर डोळा आहे. बांगलादेशी घुसखोर याच भागातून भारतात अवैधपणे शिरतात. याला आळा घालण्यासाठी या तीन चौक्या ह्या बमुनी, किशनगंज आणि चोपडा येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. या चौक्या उभारण्याचा हेतू सीमेवर कमकुवत सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागात सुरक्षा वाढवणे, गस्त वाढवणे आणि सिलिगुडी कॉरिडॉरचं रक्षण करणे हा आहे.

सिलिगुडी कॉरिडॉरला चिकन नेक म्हणून ओळखलं जातं. हा अरुंद पट्टा भारताच्या इतर भागाला ईशान्य भागातील राज्यांशी जोडतो. त्यामुळे सिलिगुडी कॉरिडॉर अत्यंत संवेदनशील असून, हा भाग बंद झाल्यास भारताचा ईशान्य भारताशी असलेला संपर्क तुटू शकतो. शेख हसीना यांच्या राजवटीत चितगाव बंदरातून त्रिपुराशी थेट संपर्क स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. यासाठी फेनी नदीवर पूलही बांधण्यात आला ज्याला मैत्री पूल असे नाव देण्यात आले. दरम्यान, बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये कनेक्टिव्हिटी आणि संरक्षण संबंधांबाबत चर्चा केली होती. मोहम्मद युनूस यांनी शेख हसिना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर चीनला गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला होता. तसेच पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याबाबत विचारविनिमय केला होता.

ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात

सामरिकदृष्टया हा भाग भारतासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने आणि इशान्य भागातील राज्यांशी जोडणारा मार्ग असल्याने शत्रूने कुठलीही आगळीक करू नये, म्हणून ‘चिकन नेक’ मध्ये भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. त्यामुळे कोणत्याही देशाला चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---