भारतीय हवाई दलाचं सुखोई ‘Su-30MKI’ लढाऊ विमान कोसळून अपघात; दोन पायलट्सचा मृत्यू, महाराष्ट्रातील एका पायलटचा समावेश…..!

---Advertisement---

 

भारतीय हवाई दलाचं एक अत्याधुनिक लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचं सुखोई Su-30MKI लढाऊ विमान कोसळून ही दुर्घटना घडली. या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सदर घटना प्रशिक्षण मोहिमेदरम्यान घडली. हे विमान आसाममधील जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाशी संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर भारतीय हवाई दलाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. नंतर शोध मोहिमेदरम्यान कार्बी आंगलोंग परिसरात विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरूगकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. हवाई दलाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, या दुःखद घटनेमुळे संपूर्ण दल शोकाकुल आहे आणि मृत वैमानिकांच्या कुटुंबियांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत.

दरम्यान, Su-30MKI हे भारतीय हवाई दलातील अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमान मानले जाते. राफेल विमानांनंतर हे सर्वात सामर्थ्यशाली फायटर जेट म्हणून ओळखले जाते. हवाई संरक्षण, खोलवर हल्ला आणि समुद्री कारवायांमध्ये या विमानाची महत्त्वाची भूमिका असते.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सध्या 200 पेक्षा अधिक Su-30MKI विमाने कार्यरत आहेत. ही विमाने रशियाच्या सुखोई कंपनी आणि भारतातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त सहकार्याने तयार केली जातात.

तसेच या विमानांना अधिक आधुनिक बनवण्यासाठी “सुपर सुखोई” प्रोग्राम राबवण्याची योजना देखील सुरू आहे. या योजनेअंतर्गत विमानांना नवीन रडार प्रणाली, आधुनिक एव्हियोनिक्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याची तयारी आहे.

दरम्यान, या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---