---Advertisement---
भारत आपण जगभरात अमेरिकेच्या जवळच्या मित्रांपैकी एक असल्याचे दाखवतो. पण, तो मोठ्या प्रमाणात शुल्क लादतो. इमिग्रेशन धोरणांवर फसवणूक करतो आणि रशियन तेल खरेदी करून युक्रेन युद्धाला वित्तपुरवठा करीत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या एका वरिष्ठ सहाय्यकाने केला.
रशियाकडून तेल खरेदी करून भारताने या युद्धाला वित्तपुरवठा सुरू ठेवणे स्वीकारार्ह नाही, असे ट्रम्प यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले असल्याचे व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ स्टिफन मिलर यांनी रविवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. रशियन तेल खरेदी करण्यात भारत मुळात चीनशी जुळलेला आहे, हे जाणून लोकांना धक्का बसेल. हे एक आश्चर्यजनक सत्य आहे, असे मिलर यांनी मुलाखतीत सांगितले.
भारत स्वतःला जगात आमच्या जवळच्या मित्रांपैकी एक म्हणून दाखवतो. परंतु, ते आमची उत्पादने स्वीकारत नाहीत, ते आमच्यावर मोठ्या प्रमाणात शुल्क लादतात. ते इमिग्रेशन धोरणात खूप फसवणूक करतात. हा प्रकार अमेरिकी कामगारांसाठी खूप हानिकारक आहे आणि आम्ही या देशाला रशियाकडून तेल खरेदी करताना पाहतो, असे मिलर म्हणाले. ट्रम्प यांना बळकट संबंध हवे आहेत आणि भारत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. मात्र, अमेरिकेला युक्रेन युद्धाच्या वित्तपुरवठ्याला सामोरे जाण्याबाबत वास्तववादी दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाला राजनैतिक, आर्थिक आणि अन्यथा सामोरे जाण्यासाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत. जेणेकरून आपण शांतता प्रस्थापित करू शकू आणि डेमोक्रॅट पक्ष आणि ज्यो बायडेन ज्या युद्धासाठी जबाबदार आहेत, ते संपपून टाकू असे मिलर यांनी म्हटले.
भारतासोबतच्या व्यापारात मोठे अडथळे
भारतासोबतच्या व्यापारात प्रचंड तूट आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात म्हटले आहे. भारत आमचा मित्र असला, तरी मागील काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यवसाय केला. कारण, त्यांचे दर खूप जास्त आहेत. जगातील सर्वांत जास्त दर भारताचे आहेत त्यांच्याकडे कोणत्याही देशापेक्षा सर्वांत कठीण आणि घृणास्पद गैर-मौद्रिक व्यापार अडथळे आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.