---Advertisement---
---Advertisement---
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्हयात लष्कराच्या पथकांनी घुसखोरीचा डाव उधळत दोन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा पाकिस्तानी अतिरेक्यांना ठार करण्यात आले.
पूंछमध्ये सीमेपलीकडून मध्यरात्री होणारी घुसखोरी लष्कराने ऑपरेशन शिवशक्ती राबवत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. घुसखोरीविरोधी यशस्वी कारवाईत भारतीय लष्कराच्या सतर्क जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन
दहशतवाद्यांना ठार केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वेगवान हालचाली आणि अचूक गोळीबारामुळे हे नापाक मनसुबे उधळून लावण्यात आले.
घटनास्थळावरून तीन शस्त्रे जप्त करण्यात आली, अशे लष्कराच्या जम्मू येथील व्हाईट नाईट कॉप्सने ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. लष्करी गुप्तचर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली. ती अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराने दिली. पूंछ सेक्टरच्या सामान्य भागात कुंपणाजवळ भारतीय लष्कराने दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. त्यानंतर ही चकमक झडली.