जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. विधानसभेच्या जळगाव शहर जागेसाठी प्रत्येक पक्षाची चाचपणी सुरु आहे. भारतीय जनता पक्षातर्फे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता लागून आहे. अशात प्रसारमाध्यमांनी आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारीबाबत विचारणा केली असता, पक्ष ज्या कोणाला तिकीट देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू असे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना आमदार सुरेश भोळे पुढे म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षात जवळपास 25-30 वर्षापासून कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. याचा पक्ष तिकीट वाटप करतांना नक्की विचार करेल. दरम्यान, मी पक्षाचे आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. माझा आपले काम चोख करण्यावर भर राहिला आहे. मी लहानपणापासून कुस्ती हा खेळत आलो आहे. या कुस्ती खेळात 365 दिवस व्यायाम करत रहा जो पहिलवान येईल त्याच्याबरोबर लढायचे असा एक चांगला नियम आहे.
यानुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता 365 दिवस काम करत असतो. सत्ता असो की नसो जनतेमध्ये जाऊन त्यांचे कामं करण्याकडे आमचा कल असतो. आम्ही सर्वच काम करु शकत नाही. 50 टक्के आम्ही काम करू शकतो 25 टक्के काम करण्याचा प्रयत्न करतो 25% काम होते ही नाही पण मला वाटतं जनतेमध्ये जाऊन त्यांचे ऐकून घेणं, समाधान करणं, प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही तसे प्रयत्न करत आलेलो आहे.
जळगाव शहराचे जनतेने आम्हाला खूप भरून दिलेले आणि जळगाव शहराच्या जनतेचा उत्तरदायी होणं आमचा धर्म आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जनता आम्हाला आशीर्वाद देईल असा आम्हाला असा विश्वास आहे. तिकीट मागण्याचा अधिकार कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनाच राहिली पाहिजे आणि अशा मागणीत काही गैर असल्याचे मला वाटत नाही. कार्यकर्ता म्हणून कामाला लागले पाहिजे ही पक्षाची भूमिका राहिलेली आहे. पक्षश्रेष्ठी सांगतील त्याला तिकीट मिळेल. ज्याला तिकीट मिळालं त्याचं काम करावं ही भूमिका पक्षाची राहिलेली आहे.