---Advertisement---

Jalgaon Accident : धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू, मुलाच्या शोधात आईची धावाधाव

---Advertisement---

Jalgaon Accident : नुकताच एका कंपनीत कामावर लागलेला मुलगा आईला गावी सोडण्यासाठी नाशिकहून भुसावळ रेल्वेने प्रवास करत होता. जळगाव ओलांडल्यानंतर धावत्या रेल्वेतून हा तरुण पडला. हा प्रकार आईला काही तरुणांनी सांगितला. भुसावळ येथे उतरून आईने रेल्वे पोलिसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी शोध मोहीम राबवून तरुणाचा शोध लावला. मात्र तो मृतावस्थेत आढळला. ही वार्ता कळाल्यानंतर तरुणाच्या आईने हंबरडाच फोडला. आनंद अशोक रजाने (वय ३३, रा. निंभोरा, ता. रावेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (६ जून) दुपारी ही घटना आसोदा शिवारात डाऊन रेल्वे लाईनवर उघडकीस आली.

नातेवाइकांच्या माहितीनुसार आनंद हा त्याच्या आईसोबत नाशिक येथे मामाकडे गेला होता. नाशिक येथे मामाच्या मदतीने तो एका कंपनीत काही दिवसांपूर्वी कामाला लागला होता. मुलगा कामावर जाऊ लागला होता. दरम्यान आज (शुक्रवारी) निंभोरा येथे आईला सोडण्यासाठी आनंद हा तिच्यासोबत रेल्वेने येत होता. जळगाव ओलांडल्यानंतर धावत्या रेल्वेतून आनंद हा खाली पडला. ही माहिती रेल्वेतील काही तरुणांनी त्याच्या आईला दिली. गर्भगळीत झालेली त्याची आई भुसावळ रेल्वे स्टेशनवर उतरली. रेल्वे पोलीस ठाणे गाठत तिने हकीकत सांगितली.

रेल्वे पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली असता रेल्वे प्रबंधक यांनी आसोदा शिवारात डाऊन लाईनवर खांबा क्रमांक
४२४/९/११ दरम्यान मृतदेह पडला असत्याची खबर पोलिसांना दिली. तालुका पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या तरुणाकडील आधार कार्डावरून तो आनंद रजाने असल्याची ओळख पटली. रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी मयत आनंद याच्या आईला रुग्णालयात आणले.

तरुण मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच तिने आक्रोश केला. नातेवाईकही शोकमग्न झाले. आनंद हा कुटुंबात एकुलता मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत. आईला निंभोरा येथे सोडून तो पुन्हा नाशिक येथे कामावर जाणार होता. आईसह बहिणींच्या रुग्णालयातील आक्रोशाने अन्य रुग्णांच्या नातेवाइकांचेही डोळे पाणावल्याचे दिसते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment