जळगाव : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून ११ मतदार संघांतील १३९ उमेदवारांनी लढत दिली. यात उमेदवारांपैकी काही जणांना आपली अनामत रक्कम देखील वाचविता आली नाही. या ११ मतदार संघांत भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ५ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक उमेदवार निवडून आला आहे.
जिल्हाभरात ८१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. या अपक्ष उमेदवारांमध्ये पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणे पसंत केले होते. यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्वच पदाधिकाऱ्यांना मतदारांनी नाकारले. यात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार माजी खासदार ए. टी. नाना पाटील, जळगावचे माजी उप महापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना उबाठा गटाचे माजी उप महापौर कुलभूषण पाटील आदींचा समावेश आहे.
उमेदवारांना द्यावी लागते इतकी डिपॉझिट
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्यात आली आहे. निवडणुकीत एकूण वैध मतांच्या एक षष्ठांशापेक्षा कमी मते मिळाल्यास संबंधित उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाते.
चोपड्यात सर्वांधिक ‘नोटा’ ला पसंती
काही मतदारांनी मतदान केंद्र गाठले मात्र त्यांचे मत कोणत्याही एका उमेदवाराच्या पारड्यात न जातात त्यांनी ‘नोटा’ ला पसंती दिल्याचे दिसून आले. या मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील एकही उमेदवार योग्य न वाटल्यास नोटाच्या पर्यायाला मतदान करून मतदार आपली असहमती दर्शवितात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात १७ हजार ६१९ मतदारांनी नोटाला पसंती दिली. चोपड्यात सर्वाधिक २ हजार ४०५ मते तसेच मुक्ताईनगरात सर्वात कमी ६२५ मते नोटाला पडली आहेत.
जिल्ह्यातील या ११ मतदारसंघात महायुतीसमोर महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरल्याचं चित्र पाहावयास मिळालं. या निवडणुकीत अपक्ष तसेच लहान पक्षांकडून अर्ज दाखल करणाऱ्या जवळपास ८४ उमेदवारांना १ हजार पेक्षाही कमी मते मिळाली. काहींची दोन आकडी मतं मिळविण्यासाठी दमछाक झाल्याचे चित्र दिसून आले. तर ११७ उमेदवारांची अनामत जप्त झाली. सर्वाधिक उमेदवार जळगाव शहर विधानसभा मतदार संघांत होते. त्यांची संख्या २९ होती. तर सर्वांत कमी उमेदवारकमी आठ उमेदवार चाळीसगाव मतदारसंघात होते.