जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून एक मोठी उपडेट समोर आली आहे. महायुती व महा विकास आघाडीसाठी हा मतदार संघ प्रतिष्ठेचा मानला जात आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या महत्वाच्या असणाऱ्या मतदार संघातून जयश्री सुनील महाजन यांच्यासह दोघांनी गुरुवार, ३१ रोजी माघार घेतली आहे. तर काल बुधवार, ३० रोजी अमळनेर विधानसभा मतदार संघातून प्रथमेश शिरीष चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.
राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांनी उमेवारी अर्ज दाखल केले होते. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांत २५८ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता. छाननीत २७ अर्ज बाद झाले असून निवडणूक रिंगणांत २३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. चोपडा व जळगाव शहर मतदार संघातून एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरला नाही. बुधवार, ३० नोव्हेंबरपासूनच अर्ज माघारी घेण्यात येत आल्याचे चित्र जिल्ह्यातील मतदार संघांत पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील राजकारणात पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे पाहावयास मिळत आहे. यात पाचोरा-भडगाव विधंदाभा मतदार संघांत महायंतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले अमोल शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघात महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार तथा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी तिकीट देण्यात आले आहे. तर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
जळगाव शहर मतदार संघांत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत माजी महापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. याच मतदार संघांत महा विकास आघाडीतर्फे माजी महापौर तथा शिवसेना उबाठा गटाच्या जयश्री महाजन ह्या अधिकृत उमेदवार आहेत. असे असताना माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यासह इतर अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जयश्री महाजन यांची माघार
दरम्यान, बुधवार, ३० नोव्हेंबरपासूनच अर्ज माघारी घेण्यात येत आल्याचे चित्र जिल्ह्यातील मतदार संघांत पाहावयास मिळत आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघातून प्रथमेश शिरीष चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. गुरुवार, ३१ रोजी पाचोरा मतदार संघातून शेख राजू शेख सलीम, चोपडा मतदार संघातून गौरव चंद्रकांत सोनवणे, चाळीसगाव मतदार संघातून संपदा उन्मेष पाटील, जळगाव मतदार संघातून अपक्ष उमेदवार यावल रहिवाशी जयश्री सुनील महाजन यांच्यासह सीमा सुरेश भोळे, डॉ. शांताराम तोताराम सोनवणे या उमेदवारांनी बातमी उपडेट होईपर्यंत पर्यंत माघार घेतलेली आहे. दरम्यान, यावलच्या रहिवासी तथा अपक्ष उमेदवार जयश्री सुनील महाजन यांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कारण महाविकास आधाडीच्या उमेदवार यांचे नाव देखील जयश्री सुनील महाजन असल्याने हा राजकीय गोंधळ निर्माण होऊन चर्चाना उधाण आले होते.