जळगाव : आई-वडिल कामाला शेतात गेले असताना घरात असलेल्या तरुण मुलाने नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, 6 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जुने जळगाव विठ्ठलपेठ परिसरात घडली. लोकेश विलास अत्तरदे (24) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबात एकुलता होता. लोकेश याचे वडील विलास पांडुरंग अत्तरदे हे स्वयंपाक कारागीर म्हणून परिचित आहेत. अन्यप्रसंगी ते शेतीकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर त्यांचा मुलगा कंपनीत किंवा हातमजुरी करुन उदरनिर्वाहाला हातभार लावत असायचा. त्याच्या पश्चात वडील विलास अत्तरदे, आई प्रतिभा, विवाहित बहिण खुशबू असा परिवार आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.