Jalgaon News: जळगाव शहरामध्ये ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन महिलेसह तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम घेऊन तब्बल १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची खळबळजनक घटना गुरूवार २८ मार्च रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ९.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील हरेश्वर नगरमधील रहिवासी असलेल्या सोनल भिमराव उपलवार यांचा व्हाटस् ॲप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीन जणांनी व्हाटस् ॲपद्वारे मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. १६ फेब्रुवारी ते २८ मार्च या दरम्यान सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपये स्वीकारले.
एवढेच नाही तर बाकीचे पैसे न वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आले. गुंतवणुकीतून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनल यांनी गुरूवार २८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यावरून मेसेज करणाऱ्या तिघांसह व्हाटस्ॲप ग्रुपचा ॲडमीन अशा ४ जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.