Jalgaon Crime : जळगाव हादरलं ! चिमुरडीची हत्या करून आईची आत्महत्या

जळगाव : शहरातील हरी विठ्ठल नगरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहितेने आपल्या ८ वर्षीय मुलीला प्रथम गळफास देत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली असून रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनाली दिपक दाभाडे (वय ३६) आणि तेजस्विनी दीपक दाभाडे (वय ८) असे मयत आई व मुलीचे नाव आहे.

सोनाली यांचे पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ते हरिविठ्ठल नगर भागात तीन मजली इमारतीत ते इतर दोन भावांसह वास्तव्याला आहेत. दीपक दाभाडे हे भावासह

आज रविवार, २४ रोजी नातेवाईकाचे निधन झाल्याने दीपक दाभाडे हे भुसावळ येथे भावांसह गेले होते. त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते. त्यांनी सकाळी ९ वाजेनंतर कधीतरी मुलीला एका स्कार्फने गळफास देऊन स्वतः सोनाली दाभाडे यांनी दुसऱ्या स्कार्फने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुपारी १२ वाजेच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा घटना उघड झाली. तिसऱ्या मजल्यावर पती गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता. तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह आढळून आले. याचा दीपक यांना मोठा धक्का बसून त्यांनी एकच हंबरडा फोडला.

नातेवाईकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.