Amalner Murder News : प्रियकराच्या मदतीने नणंदेने संपविले वहिनीला, कारण जाणून व्हाल थक्क !

जळगाव : अमळनेर शहरात बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये रविवारी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. आईच्या जागेवर वाहिनी नगरपालिकेत अनुकंपा तत्वावर लागू नये याकरिता नणंदेनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहिती  अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

शितल जय घोगले (वय ३५, रा. मेहकर कॉलनी, गांधलीपुरा, अमळनेर) ही विवाहीतीच पती, सासू यांच्यासह वास्तव्य होती. रविवार ,  २२  सप्टेंबर रोजी मेहतर कॉलनी समोर बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये शितल घोगले ह्या मृतावस्थेत आढळून आल्या.  याप्रकरणी पोलिसांनी जलदगतीने तपासचक्र फिरवत पुराव्याच्या आधारे त्यांनी मयत शितल घोगले हिची नणंद व तिचा प्रियकर यांना अटक केली.

शितल घोगले यांची सासू पारोबाई परशुराम घोगले (वय ५५) या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा जय सतत आजारी राहत असल्याने पारूबाई यांच्या जागी नोकरीवर त्यांची सून शितल लागणार होती.
तिच्या ऐवजी मुलगी म्हणून आपणच लागले पाहिजे असा विचार पारूबाई यांची मुलगी मंगला हिचा होता.

रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शितल आणि मंगलाबाई या दोघी घराबाहेर शौचासाठी गेल्या होत्या. मंगला घरी परत आली परंतु शीतल ही घरी परतलीच नाही.  म्हणून तिचा शोध घेतला काटेरी झुडपात शितल ही मृत अवस्थेत आढळून आली.

पोलिसांच्या तपासादरम्यान मंगला हिने मी शौचाहून पाच मिनिटातच परत आल्याचे सांगितले. परंतु, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती तब्बल २५ मिनिटांनी परत येताना दिसली आहे. तसेच तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळताच तिला विचारले, मी त्याच्याशी कधीपासून बोललेली नाही असे तिने सांगितले. मात्र सीडीआर रिपोर्ट तपासला असता ती वारंवार आणि रात्री देखील तिचा प्रियकर याचेशी बोलताना दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संशयित आरोपी मंगला घोगले हिच्यासह तिचा प्रियकर करण मोहन घटायडे (वय ३४, रा. आयोध्या नगर, बंगाली फाईल) याच्या मदतीने नणंद मंगल हिने भावजय शितलचा गळा दाबून, दगडाने डोक्यावर, हातावर व गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय दत्तात्रय पोटे,अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे तपास पूर्ण केला आहे.