Jalgaon Crime : इलेक्ट्रिकल पोतवरील ॲल्युमिनियमचे तार चोरून पळून जाणाऱ्या टोळीस प्रत्यक्षदर्शीनी पाठलाग करून तिघांना पकडले तर इतर तिघे फरार झाले. गुरुवारी (५ जून) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारातील कुसुंबा येथे घडली. पकडलेल्या चोरट्यांकडून सुमारे ४० हजारांची वीजवाहक तार जप्त करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली शिवारातील कुसुंबा येथे झोपडपट्टी परिसरापासून सुमारे ७०० ते ८०० मीटर अंतरावर इलेक्ट्रिक पोलवर विद्युत वाहक तार टाकली आहे. दुपारच्या वेळी चोरट्यांनी या ठिकाणी एण्ट्री केली. विजेच्या तारा कापून त्या चोरून पळ काढला. काही प्रत्यक्षदर्शीनी हा प्रकार पाहताच पाठलाग केला. त्यांनी तिघा संशयितांना पकडले. मात्र अन्य तिघे साथीदार पसार झाले.
पकडलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस नरीक्षक बबन आव्हाड यांनी धाव घेतली. मनोज गोपाल मोरे (३०, रा. मेहरूण), विनोद मूलचंद राठोड (३६, रा.रामेश्वर कॉलनी), विधीसंघर्ष बालक, रा. मेहरूण यांना पोलिसांनी अटक केली. अन्य तिघे साथीदार पसार झाले. या प्रकरणी ठेकेदार संजय वराडे (४५. रा. चिंचोली) यांच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे तपास करीत आहेत.