तरुण भारत लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । जिल्हा सहकारी दूध उत्पादक संंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत 20 संचालकांसाठी निवडणूक प्रकिया सुरू आहे. दूध संघाच्या संचालक मंडळासाठी 40 उमेदवार निवडणूक लढवित असून शनिवारी सकाळी आठ वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. यात सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत 100 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शनिवारी जिल्हाभरात सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दूध संघ संचालक मंडळाच्या 20 संचालक मंडळासाठी 40 उमेदवार निवडणूक लढवित असून मंत्री गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, आ.चिमणराव पाटील, तर खडसे गटाच्या मंदाकिनी खडसे, डॉ.सतीश पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांमध्ये सरळसरळ लढत आहे.
मतदान केंद्रावर उमेदवार समर्थकांचीच गर्दी
जळगाव येथे सत्यवल्लभ हॉल रिंग रोड येथे जामनेर आणि जळगाव मतदार संघासाठी मतदान केंद्रांवर महिला राखीव मतदार संघासह जामनेर आणि जळगाव संघातील अनु.जाती, वि.जा.भ.ज, सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय असे 5 गटातील उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर उपस्थित असल्याचे दिसून आले. महिला राखीव संघाच्या उमेदवार मालतीबाई महाजन, पूनम पाटील, तसेच अरविंद देशमुख, मंत्री गिरीष महाजन, दिनेश पाटील आदि उमेदवारांचे प्रतिनिधीं महापौर जयश्री महाजन अशोक लाडवंजारी विष्णू भोळे, यांच्यासह महाविकास आघाडी आणि महाजन गटातील उमेदवारांसह समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
उमेदवारांसह अन्य मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा दूध संघाच्या जळगाव मतदान केंद्रावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांंच्या सासूबाई मालतीबाई महाजन यांनी सकाळी तर दुपारी मंत्री गिरीश महाजन यांनी मतदान केले. जिल्ह्यातील भुसावळ केंद्रावर मंदाकिनी खडसे, भाजपचे आ. संजय सावकारे, अॅड.रविंद्र पाटील यांच्यासह अन्य मतदारांनी मतदान केले. पाचोरा मतदान केंद्रावर आ. किशोर पाटील, आ.दिलीप वाघ, अमळनेर केंद्रावर आ. अनिल भाईदास पाटील, माजी आ.स्मिता वाघ, चाळीसगाव मतदान केंद्रावर आ. मंगेश चव्हाण यांच्यासह अन्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
आ.खडसे एकाकी पडल्याचे चित्र
दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कमालीची चुरस आहे. यात आ.एकनाथराव खडसे या निवडणुकीत एकटे पडल्याचे चित्र आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ना. गिरीश महाजन, आ. मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत पाटील, आ.चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील आ.संजय सावाकरे असे सहा ते सात आमदार खडसे यांच्याविरोधात आहेत.
गेल्या सात वर्षापासून सत्ता कोणाची
सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये संचालक मंडळाऐवजी दूध संघावर प्रशासक नेमण्यात आले. नेमके त्याच काळात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांची चोरी अफरातफर अखाद्य तूप आणि लोणी आदि संदर्भात बेकायदेशीररित्या देवघेवीचे व्यवहार समोर आले. यात एमडी, अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ऐन निवडणूक काळात हे मुद्दे गाजले. नेत्यांनी एकमेकांवर टोकाचे आरोप केले.
उद्याचा निकाल आमचाच
जिल्हा दूध संघात कोण किती काम केले आहे हे सर्वसामान्यांना चांगलेच माहीती आहे. डबघाईसह विक्रीस निघालेला दूध संघ गेल्या पाच-सात वर्षात अतीशय काटेकोर व्यवस्थापन, व्यवस्थापनावरील अनाठायी खर्चांवर नियंत्रणात आणल्यामुळेच दूध संघ नफ्यात आला आहे, असा दावा खडसे गटाकडून केला जातो. तसेच वेळोवेळी शेतकर्यांना लाभांशासह पशुखाद्याचा नियमित पुरवठा केलेला असून इतर दूध संघाच्या मानाने दूधाचे दरदेखील फायदेशीर असेच दिले आहेत. त्यामुळे दूध संघाचा उद्याचा निकाल आमचाच असून सहकर पॅनलच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास आ.एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा दुध संघात गेल्या पाच सात वर्षातील गैरव्यवहार निवडणूकीपूर्वीच उजेडात आले. यात दूध, तूप लोण्याचा लाभार्थी कोण हे सर्वसामान्य जनतेसह मतदारांना आहे. त्यामुळे मतदारांचा आम्हाला पाठींबा मिळाला आहे. उद्या मतमोजणीतून आमचा विजय निश्चीत होणार आहे. एकनाथ खडसे यांच्या कारकिर्दी सर्वात मोठा पराभव असेल -असा विश्वास आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
समर्थकांचे दावेप्रतिदावे
या मतदान प्रक्रियेदरम्यान शेतकरी पॅनल आणि सहकार पॅनल असे दोन पॅनल असे महाजन आणि खडसे गटाचे उमेदवार एकमेकांसमारे उभे ठाकले असून दोन्ही गटांच्या उमेदवारांसह समर्थकांनी आमचेच पॅनल विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत आमच्या समोर मोठे मंत्री असले तरी आमचे पॅनल हे सर्वसामान्य शेतकर्यांचे आहे. यामुळे मतदार आम्हाला कौल मिळणार असल्याचा विश्वास महापौर जयश्री महाजन, आ. खडसे समर्थक अशोक लाडवंजारी यांच्यासह अनेक अनुयायांनी केला.
अनुभव मोठा आहे म्हणूनच एवढे घोटाळे
शेती सोबतच दूग्ध व्यवसाय हा शेतकर्यांसाठी जोडव्यवसाय आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघावर शेतकर्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यात बहुतांश उमेदवार देखील दूध उत्पादक संघाशी जोडलेले असून शेतकरी पॅनले सर्वच उमेदवार बहुमताने निवडून येतील. यामुळेच अनुभव नसलेले दूध संघाच्या निवडणूकीत असल्यासारखी उलट सुलट विधाने आरोप खडसेेेंकडून केली जात आहेत. यापूर्वी जिल्हा बँक, दूध संघात त्यांच्या हिमतीवर कुटूंबियांना निवडून आले की भाजपामुळे हे त्यांनी सांगावे. ते आता विरोधी पक्षात आहेत. त्यांनी त्यांच्या कुटूंबियांना स्वबळावर निवडून आणावे, असे आव्हान देत मंत्री गिरीश महाजन यांनी दूध संघाच्या निवडणुकीत आमचेच पॅलन विजयी होईल असा दावा केला.
असे आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार
जिल्हा दूध संघासाठी अनु.जाती जमाती गटातून- संजय सावकारे, श्रावण ब्रम्हे, इतर मागास वर्ग गटातून- गोपाळ रामकृष्ण भंगाळे, पराग वसंतराव मोरे, महिला राखीव गट – पुनम प्रशांत पाटील, उषाबाई विश्वासराव पाटील, मनिषा अनंतराव सूर्यवंशी, सुनिता राजेेंद्र पाटील, छाया गुलाबराव देवकर, वि.जा.भ.ज.वि.मा.प्र.गट- विजय रामदास पाटील, अरविंद भगवान देशमुख, अमळनेर तालुका-स्मिता उदय वाघ, अनिल भाईदास पाटील, एरंडोल तालुका-दगडू धोंडू चौधरी, भागचंद मोतीलाल जैन, चाळीसगाव तालुका-प्रमोद पांडूरंग पाटील, सुभाष नानाभाऊ पाटील, चोपडा तालुका-इंदिराबाई भानुदास पाटील, रोहीत दिलीप निकम, जळगाव तालुका- गुलाबराव रघुनाथ पाटील, मालतीबाई सुपडू महाजन, जामनेर तालुका- गिरीश दत्तात्रय महाजन, दिनेश रघुनाथ पाटील, धरणगाव तालुका- संजय मुरलीधर पवार, वाल्मिक विक्रम पाटील, पारोळा तालुका-चिमणराव रूपचंद पाटील, डॉ.सतीश भास्कर पाटील, बोदवड तालुका-अॅड.रविंद्र प्रल्हादराव पाटील, मधुकर रामचंद्र राणे, भडगाव तालुका-रावसाहेब प्रकाश भोसले, डॉ.संजीव कृष्णराव पाटील, भुसावळ तालुका- शामल अतुल झांबरे, शालिनी मधुकर ढाके, मुक्ताईनगर तालुका-मंदाकिनी एकनाथ खडसे, मंगेश रमेश चव्हाण, यावल तालुका-हेमराज खुशाल चौधरी, नितीन नारायण चौधरी, रावेर तालुका-ठकसेन भास्कर पाटील, जगदीश लहू बढे अशा उमेदवारांमध्ये लढत आहे. तर पाचोरा तालुका दिलीप ओंकार वाघ एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध ठरले आहेत.