Jalgaon News: केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूशखबर, बनाना क्लस्टरसाठी जिल्ह्याची निवड

जळगाव : जिल्ह्याला केळी उत्पादनासाठी देशभर आणि विदेशात ओळख मिळालेली आहे. आता, या जिल्ह्याच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आणखी एक मोठा फायदा होणार आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने क्लस्टर विकास कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याची निवड केली आहे. यानुसार, जळगावमध्ये मेघा क्लस्टर प्रकल्प सुरू होणार आहे, जो जवळपास 100 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना केळी उत्पादनाच्या दृष्टीने उत्तम बाजारपेठ मिळणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

क्लस्टर विकास कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे उत्पादन क्षमता वाढवणे, निर्यात सुधारणे, आणि ऑर्गानिक फार्मिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे. 53 फलोत्पादन क्लस्टर तयार करण्याची योजना असून जळगाव जिल्हा त्यात एक महत्त्वाचा पायलट प्रकल्प बनला आहे. या प्रकल्पाअंतर्गत रॅपिंग, कोल्ड चेंबर्स, हाय डेव्हलपिंग लॅब आणि टिशू कल्चर यावर संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय रक्षा खडसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे व भाजपा जिल्हा महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे किसान मोर्चाचे नारायण चौधरी, जिल्हा सरचिटणीस पूर्व श्रीकांत महाजन, जिल्हा प्रसिद्ध माध्यम समन्वयक मनोज भांडारकर व परिक्षीत बऱ्हाटे, गोपाळ नेमाडे, वासुदेव नरवाडे, विजय महाजन, पी. के. महाजन, रामशंकर दुबे, शुभम पाटील, स्वप्नील पाटील, सागर भारंबे, किरण चौधरी,भास्कर भंगाळे, चेतन शर्मा आदी  उपस्थित होते.

 

केळी उत्पादनाचे मुख्य केंद्र असलेल्या रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर या भागांतील शेतकऱ्यांना ऑर्गानिक फार्मिंग च्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल. ऑर्गानिक उत्पादनांना चांगला भाव मिळतो आणि त्यावर सरकारच्या माध्यमातून सबसिडी देखील दिली जाईल.

याशिवाय, रेल्वेने केळींची थेट वाहतूक करण्याची सोय केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीवरील खर्च कमी होईल. तसेच, रशिया आणि इतर शेजारील देशांमध्ये जळगाव जिल्ह्याच्या केळीला नवीन निर्यात बाजारपेठ मिळणार आहे. एपीईडीएच्या माध्यमातून रशियामध्ये केळी निर्यातीबाबत चर्चा सुरू आहेत.

क्लस्टर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर प्रोसेसिंग युनिटसुद्धा स्थापित केली जातील, ज्यामध्ये बनाना पावडर सारखी उत्पादने बनवली जातील. फ्रोजन फूड मार्केटचा देखील विस्तार होईल.

जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना हायटेक लॅब्सच्या मदतीने माती परीक्षण आणि खतांचा योग्य वापर शिकवले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी मदत मिळेल. या प्रकल्पाची पूर्तता दोन वर्षात होईल असे सांगण्यात आले आहे.

संपूर्णपणे, जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प एक मोठा आर्थिक संधीचा मार्ग ठरेल, आणि त्यांना नवीन बाजारपेठ मिळण्यास मदत होईल.