परतीच्या पावसाने जळगाव जिल्ह्याला झोडपले; आजही पावसाचा अंदाज

जळगाव : जिह्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार मंगळवारी आणि बुधवारी रात्री जळगाव जिह्यात दमदार पाऊस झाला. एका दिवसात जिल्ह्यात १७ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, आजही जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पाचोरा, पारोळा, अमळनेर, जामनेर, धरणगाव व एरंडोल या तालुक्यांना परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. तर रावेर, जळगाव, चोपडा, यावल, भुसावळ या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत ७०९ मिमी पाऊस चार महिन्यांत झाला आहे.

आतापर्यंत एकूण सरासरीचा ११५ टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच जलसाठ्यांमध्ये
चांगला जलसाठा देखील आहे. मंगळवारी आणि बुधवारी रात्री सर्वाधिक ४५ मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला. तर अमळनेर तालुक्यातील नगाव या महसूल मंडळात अतिवृष्टीचीही नोंद झाली असून, या महसूल मंडळात ७० मिमी पाऊस झाला आहे.

पाचोऱ्यात पिकांचे नुकसान
 पाचोरा तालुक्यातील अनेक भागात कापूस , मक्का, सोयाबीन पिके आडवी पडल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे पाचोरा शहरातील मानसिंगका इंडस्ट्रीजसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला. भुयारी मार्गात ही मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. जारगाव चौफुली वरील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती. या पावसापूर्वी पिकांची स्थिती उत्तम असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी -आनंद दिसून येत होता मात्र, मंगळवारी आणि बुधवारी रात्री धुवाधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.