जळगाव : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आयोध्या येथे पहिली ट्रेन ३० सप्टेंबर रोजी घेऊन जाणार आहे. या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरवी झेंडी दाखवणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयासाठी इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठया प्रमाणात अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांचेकडे प्राप्त झाल्याने, प्रवाशांची निवड करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवन, जळगाव येथे लॉटरी (ड्रॉ) आयोजीत करण्यात आला होता. या लॉटरी (ड्रॉ) साठी जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समिती जळगाव यांच्यामार्फत श्रीम.शितल राजपूत, तहसिलदार, जळगाव व श्री.प्रमोद ब-हाटे, संपादक व सामाजिक कार्यकर्ता यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
जळगांव जिल्हयातून एकुण १ हजार १७७ अर्ज पात्र ठरले होते, सदर पात्र ठरलेल्या अर्जामधून लॉटरी सोडती व्दारे निरीक्षकांच्या उपस्थित इन-कॅमेरा ७६१ लाभार्थ्याची निवड करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्याचे जोडीदार (पती / पत्नी) असे ३५ लाभार्थी व १२ सहायक असे एकुण ८०८ लाभार्थ्याची श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
सदरची ट्रेन ही ३० सप्टेंबर रोजी सर्व लाभार्थ्यांना आयोध्या येथे घेऊन जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री या ट्रेनला ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवतील व मार्गदर्शन करतील अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.