जळगाव : शहरात आतापर्यत १ लाख मालमत्ताधारकांची मनपाकडे नोंद झाली आहे. त्यापैकी ८० हजार नळसंयोजने देण्यात आली आहेत. अजुन २० हजार नागरिकांनी नळ संयोजने घेतलेली नाहीत. याबाबत महापालिकेने नागरिकांना वेळोवेळी सुचीत केले होते. त्याकडे दूर्लक्ष केल्याने आता त्यांना दंडासहीत नळसंयोजने घ्यावी लागणार आहेत.अमृत ०१ च्या पहिला टप्पा आता जवळपास पूर्ण होत आलेला आहे. त्यामुळे आता अमृत ०२ चा डीपीआर तयार करून तो मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे.
अमृत ०१ च्या पहिल्या टप्प्यात ६५ हजार नळसंयोजने होती. नंतर नविन मालमत्ता वाढल्याने त्यात अधिकची भर पडत १५ हजार नविन नळ संयोजने देण्यात आलीत. सूचनेकडे दुर्लक्ष अमृतचा पहिला टप्पा पूर्ण होत आल्याने आता शहराच्या विविध भागात रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. रस्ता तयार झाल्यानंतर अनेकजण नळ संयोजने मागत आहेत. त्यामुळे तयार झालेले रस्ते पुन्हा खोदल्याने ते खराब होतील. त्यामुळे रस्ते तयार होण्यापूर्वी तत्कालीन नगरसेवकांसह महापालिकेने याबाबत फलक व माध्यमांव्दारे नागरिकांना माहिती दिली होती. त्यानुसार अनेकांनी नळ संयोजने घेतलीत.
मनपा देणार नळसंयोजन
सध्या वाघुरच्या जुन्या जलवाहीनीतून व अमृतच्या जलवाहीनी अशा दोघांतून पाणी पुरवठा केला जात आहे. अमृतचा पाणी पुरवठा हा चाचपणी म्हणून होत आहे. तो यशस्वी होताच जुन्या जलवाहीन्या बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नळसंयोजने न घेतलेल्या सुमारे २० हजार नागरिकांना आता मनपातर्फे नळसंयोजन देण्यात येणार आहेत. केलेल्या करारानुसार अमृतच्या मक्तेदाराने नळसंयोजने दिली आहेत. आता पुढील सर्व संयोजने मनपाच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात येणार आहेत.
दंडासह नियमित शुल्क
नळ संयोजने न घेतलेल्या सुमारे २० हजार नागरिकांना आता नळ संयोजने घेतांना दंडासह नियमित शुल्क द्यावे लागणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगीतले.