जळगाव : पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वेचत असताना शुक्रवार, २६ रोजी ३८ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू झाला होता. या अनोळखीची ओळख पटविण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र चार दिवस उलटूनही कोणीही वारसदार समोर न आल्याने सोमवार, २९ रोजी सायंकाळी लोहमार्ग पोलिसांनी कायदेशीर कारवाई करीत या अनोळखी व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फलाट क्रमांक दोनजवळ शुक्रवारी लोहमार्गावर अनोळखी इसम रिकाम्या झालेल्या बाटल्या गोळा करीत होता. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला होता. अनोळखीची ओळख पटू न शकल्याने अखेर पोलिसांनी त्याचा अंत्यसंस्कार विधी केला. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे एएसआय अनिंद्र नगराळे व सहकारी याप्रसंगी उपस्थित होते