भुसावळ : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील दोघे ठार झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खडका चौफुलीनजीक घडला. अपघातानंतर ट्रकमध्ये दुचाकी अडकल्यानंतर चालकाने मारहाण होण्याची भीतीने तब्बल १६ किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत नेली मात्र पोलिसांनी नाकाबंदी लावल्यानंतर नशिराबाद टोल नाक्यानजीक ट्रक चालकाला अटक करण्यात आली.
तर अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक जप्त करण्यात आला. या अपघातात जितू राठोड व प्रकाश उखा तंवर (दोन्ही रा.माधव तांडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू ओढवला. भीषण अपघातात दोघे जागीच ठार जितू राठोड व प्रकाश तंवर हे दोघे नातेवाईक प्लॅटीना दुचाकीवरून दीपनगरकडून जळगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव दहा चाकी ट्रक (आर. जे.११ जी.ए.९९०३) ने दुचाकीलाने धडक दिल्याने डोक्याला जबर फटका बसल्यानंतर त्यांचा मेंदू बाहेर येवून दोघे जागीच गतप्राण झाले तर ट्रकच्या पुढील भागात दुचाकी अडकली.
मारहाणीच्या भीतीने ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक नशिराबादच्या दिशेने नेला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर नशिराबाद टोल नाक्याजवळ पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी व पथकाने ट्रक चालक श्याम बाबू यास अटक केली.