यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय संशयित तरुणाला अटक केली. या तरुणाची दुचाकी अल्पवयीन मुलीच्या अपहरणकर्त्याकडे असून याच दुचाकीव्दारे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. या अपहरणात एक विधी संघर्षित बालकासह तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे तर अटक करण्यात आलेल्या तरुणाला यावल न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
डांभुर्णी गावातून रविवार, २१ जानेवारी रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी मंगळवारी डांभुर्णी गावातील धम्मदीप सुधाकर जंजाळे (२१) या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, प्रवीण प्रकाश सोळुंके (रा.डांभुर्णी) याने अल्पवयीन मुलीचे त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ ई.सी.६६५८) द्वारे अपहरण केले व ही मोटारसायकल अजूनही प्रवीण सोळुंकेकडे आहे.
या प्रकरणात गावातील एक १६ वर्षीय विधी संघर्षीत बालकाचादेखील समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेल्या धम्मदीप जंजाळे यास यावल येथील न्यायालयात न्यायाधीश एस.बी. वाळके यांच्यासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला १ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, श्याम धनगर करीत आहे.