जळगाव : सायबर ठग वेगवेगळा फंडा वापरुन ग्राहकांच्या बँक खात्यातून ऑनलाईन गंडा घालतात. सायबर ठगांनी शहरातील एका डॉक्टराला इडी कार्यालयातून बोलतोय, असे सांगत मनी लॉन्ड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आलेय, अशी बतावणी केली.
कारवाई टाळण्यासाठी ऑनलाईन पैशांची मागणी करीत १९ लाख २० हजाराचा गंडा घातला. याप्रकरणी मंगळवार, २१ रोजी सायबर पोलीस ठाण्यात डॉक्टरने धाव घेत कैफियत मांडली. शहरातील एका डॉक्टरला बुधवार, १ मे रोजी अंकुश वर्मा तसेच सुनीलकुमार नावाच्या व्यक्तींनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. इडीच्या कार्यालयातून बोलत आहोत, मनी लॉन्ड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आले आहे.
त्यात तुम्ही सहभागी आहेत, असे समोर आले आहे. यातून तुमची सुटका करायची असेल तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे वागा, असा सल्ला दिला. संशयितांनी डॉक्टरला साधे व व्हिडीओ कॉलही केले. त्यानंतर संशयितांनी डॉक्टरला त्यांचे बँक खाते नंबर दिला. त्यात पैसे टाकण्याचे फर्मान केले.
या प्रकाराने गर्भगळीत झालेल्या डॉक्टराने वेळोवेळी संशयितांच्या खात्यात १९ लाख २० हजार इतकी रक्कम टाकली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.