जळगाव : घरात एकांतवासात असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना कुसुंबा येथे उघडकीस आली. महेश छगन गोसावी (36) रा.नवीन कुसुंबा असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश गोसावी हे सुभाष चौक परिसरात सराफ बाजारातील एका चांदीच्या दुकानात कामाला होते. आज घरात एकटे असताना त्यांनी छताला गळफास लावून मृत्यूला कवटाळून घेतले. हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. महेश गोसावी यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. परंतु तपासणीत वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंजन देशमुख यांनी त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तरुणाच्या टोकाच्या निर्णयामागील कारण कळू शकलेले नाही. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई तसेच भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.