जळगाव : सार्वजनिक ठिकाणी भांडे घासणाऱ्या तरुणीकडे पाहत दोन अल्पवयीन मुलांनी अश्लिल हावभाव करत तसेच तिचा हात पकडला. यामुळे संतप्त पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. याप्रकरणी दोघे अल्पवयीन बालकांवर विनयभंगाचा गुन्हा शनिवार १३ रोजी दाखल झाला. २३ वर्षीय तरुणी मोलकरीणचे काम करुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावते. शनिवार १३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही तरुणी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीप्रमाणे घरासमोर सार्वजनिक ठिकाणी भांडे घासण्याचे काम करीत होती. त्यावेळी विधीसंघर्ष बालक तिच्याकडे बघत अश्लिल हावभाव करु लागला. त्याने त्यानंतर चक्क तरुणीला डोळा मारला.
साथीदारही सरसावला पुढे
बालकाच्या या वागणुकीकडे तरुणीने दुर्लक्ष केले. तोवर या बालकाचा साथीदार विधीसंघर्ष बालकाने तरुणीकडे बघत अश्लिल हावभाव करण्याला सुरुवात केली. तिच्या दिशेने पुढे जात या बालकाने चक्क तरुणीचा हात पकडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जात या दोघा संशयितांविरुध्द तरुणीने तक्रार दिली. प्रकार कळताच पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत तसेच प्रभारी पो. नि. रंगनाथ धारबडे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकार जाणून घेतला. याप्रकरणी दोघे विधीसंघर्ष बालकांविरुध्द विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिसात नोंदविण्यात आला. तपास स.फौ. विजय पाटील करीत आहेत.