Jalgaon News: एमआयडीसी पोलिसांचे मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन

जळगाव: एमआयडीसी पोलिसांनी रविवार, २८ रोजी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. दोन वर्ष हद्दपार केलेल्या संशयिताच्या रात्री एक वाजता राहत्या घरी मुसक्या आवळल्या. संशयास्पद रितीने फिरणारे, न्यायालयाच्या अजामीन पात्र वॉरंटमधील हे संशयित पोलिसांच्या रडारवर आले. तसेच नाकाबंदी करीत १३ केसेस करुन ९०० रुपये दंड वसूल केला.
उदय रमेश मोची (रा. रामेश्वर कॉलनी मेहरुण) याला दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

हा संशयित शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान तपासणी मोहीम राबवित त्याला रात्री त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. राहुल जीवन पांडे हा रात्री दोन वाजेच्या सुमारास टायटन कंपनीजवळ संशयितरित्या फिरत होता. कारवाईतून त्यालाही ताब्यात घेतले.

अजय बिरजू गांरुगे हा दोन वर्षापासून स्टॅण्डिंग वॉरंटमध्ये फरार होता. या ऑपरेशनमध्ये तो पोलिसांच्या हाताला लागला. भोला राकेश बागडे, विशाल भागवत सुरवाडे, गोलू उर्फ राजकिसन मानसिंग परदेशी, आबा मधुकर पाटील, यांच्याविरुध्द न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट बजावले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील १३ डिस्ट्रिशीटर चेक करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान १३ केसेस करुन ९०० रुपये दंड वसूल केला.ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, संजयसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्सटेबल अनिल तायडे, पोलीस हेड कॉन्सटेबल मंगेश बागूल, दिनेश चौधरी, संदीप सपकाळे, सचिन पाटील, योगेश बारी, चेतन सोनवणे, सतीश गर्जे, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, गणेश वंजारी यांनी ही कारवाई केली.