Jalgaon News : करार न करताच भाडेकरू ठेवलाय ? आता महापालिका घेणार अशा मालमत्तांचा शोध

जळगाव : निवासी घरात कोणताही भाडेकरार न करता भाडेकरू ठेवला आहे. निवासी घरांचा व्यावसायिक वापर केला जातोय. व्यावसायिक जागेत पोट भाडेकरू ठेवलाय. मालमत्ता कराराने भाड्यावर दिल्या आहेत. अशा सर्व प्रकारच्या मालमत्तांचा आणि व्यावसायीक प्रतिष्ठानांचा महापालिकेचा वसुली विभाग शोध घेत आहे. जिल्हा उपनिबंधकाकडून शहरातील किती मालमत्ताधारकांनी भाडे करार केला आहे, त्याची माहितीही मागविण्यात आली आहे.

सन् २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या एप्रिलपर्यंत नियमित मालमत्ता कर भरणाऱ्यांना १० टक्के सुट देण्यात आली होती. त्यानंतर मे पासून नियमित बिलांचे वाटप करण्यात आले. त्यांना बिल मिळाल्याच्या तारखेपासून सात दिवसात बिल जमा केल्यास ७ टक्के नंतर ५ टक्के अशी सुट देण्यात आली होती. त्याचाही मालकत्ता धारकांनी लाभ घेतला. यातून ज्या मालमत्ता धारकांनी करांचा भरणा केला नाही अशा मालमत्ता धारकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे.

जप्तीच्या नोटीस
दोन व त्यापेक्षा जास्त वर्ष थकबाकीदार असलेल्यांसह इतर अशा सुमारे ७ हजार ६६२ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा बजवण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यांना बिल दिल्याच्या तारखेपासून पुढील पंधरा दिवसात करांचा भरणा करावा करावा लागणार आहे.

भाडेकरूसह व्यावासायीक निवासांचा शोध
शहरात अनेक मालमत्ता धारकांनी भाडेकरू ठेवले आहेत. त्याची कोणतीही अधिकृत नोंद केलेली नाही. तसेच निवासी मालमत्तांचा व्यावसायीक वापर करत आहेत. तर व्यावसायीक मालमत्तेत पोट भाडेकरूही ठेवला आहे. अशा सर्व मालमत्तांचा शोध आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अविनाश गांगोडे, महसुलचे उपायुक्त व सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी हे अचानक भेटी देत पाहणी करणार आहेत.

निबंधकांना दिले पत्र
शहरातील किती निवासी मालमत्ता या भाड्याने, व्यावसायीक कारणांसाठी दिलेल्या आहेत. याबाबतचे करारनामे जिल्हा निबंधकांकडून मागविण्यात येणार आहेत. तसे पत्रही त्यांना दिले आहे.

असा होईल दंड
रहिवासी मालमत्तांचा व्यावसायिक वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांचा शोध घेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ६०० ते १००० चौरस फुटापर्यंत बांधकाम असलेल्या मालमत्ता धारकांना कराच्या ५० टक्के व १००० चौरस फुटाच्या वरील मालमत्ताधारकांना जेव्हढा कर असेल तेव्हढा दंड आकारण्यात येणार आहे.

७ हजार ६३२ थकबाकीदार
दोन व त्यापेक्षा जास्त वर्ष थकबाकीदार असलेल्यांसह इतर अशा सुमारे ७ हजार ६६२ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा बजवण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यांना बिल दिल्याच्या तारखेपासून पुढील पंधरा दिवसात करांचा भरणा करावा लागणार आहे. त्यानंतर थकबाकीदार असलेल्यांच्या मालमत्ता जन्त करण्यात येणार आहेत.

प्रभाग समिती निहाय थकबाकीदार
प्रभाग समिती क्रमांक १ – २०९९
प्रभाग समिती क्रमांक २ – १४८३
प्रभाग समिती क्रमांक ३ – ३४८८
प्रभाग समिती क्रमांक ४ – ०५६२