Jalgaon News: दोन गटात हाणामार ,चार जण जखमी दोन्ही गटांची शहर पोलीस ठाण्यात धाव

जळगाव :  किरकोळ कारणावरुन दोन गटात तुडुंब हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. रविवार, २४ रोजी शहरात लक्ष्मीनगरमागे सी.टी. कॉलनीच्या कोपऱ्यावर ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यत सुरू होते. सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत गर्दी पांगविली.समशेरखान घासीखान (वय ४४, रा. गेंदालाल मिल) हे दूध विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी दुपारी त्यांचा मुलगा रईसखान याने घरुन १८०० रुपये घेतले. त्यानंतर तो दुचाकी घेऊन गाींसाठी ढेपचे पोते घेण्यासाठी शहरात गेला. सी.टी. कॉलनीच्या कोपऱ्यावर मुसेफ अकीलखान याने त्याची दुचाकी अडवित रईस याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या खिशातील रोकड काढून घेतली. हा प्रकार रईस याने वडील समशेरखान यांना कळविला.

समशेरखान तसेच त्यांचे बंधू सलीमखान हे घटनास्थळी रवाना झाले. याठिकाणी तौसीफखान,अकील शेख, अमीर शेख, जुनेदखान यांच्यासह इतर रईस याच्याशी भांडत होते. समशेरखान हे समजविण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईप टाकला. अमीर शेख याने समशेरखान यांचे बंधू सलीमखान याना लाकडी बॅटने मारहाण केली. इतरांनी तिघांना हाता-पायाने मारहाण केली. दुसऱ्या गटाच्या शबीनाबी शेख यांच्या तक्रारीनुसार समशेरखान, रईसखान, सलीमखान यांच्यासह इतरांनी मुसेफ अकीलखान, तौसीफ खान, अकील शेख, अमीर शेख यांच्यासह इतरांना मारहाण केली.

लोखंडी पाईपने मारहाण करुन दुखापत केली. या घटनेत दोन्ही गटाचे चार जण जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. दोन जखमी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन्ही गटाचे समर्थक या हाणामारीत जखमी झाले आहेत