जळगाव : येथील रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ४ वरील रेल्वेट्रॅकवर शुक्रवार, १४ रोजी सायंकाळी इंधन वाहतूक करणारी रेल्वे उभी होती. नेमके त्याच वेळेस साधारण ४५ ते ५० वर्षांची एक व्यक्ती त्या टँकरसारख्या डब्याच्या शिडीवरून वर चढली. डब्यावर चढून तो उभा राहताच रेल्वेगाड्यांना वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीचा त्याच्या डोक्याला स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे पोलिस कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी दिलेल्या तक्रारी नोंदीनुसार, रेल्वेस्थानकाचा फलाट क्रमांक ४ वर उभ्या मालगाडीच्या डब्यावर चढलेल्या वृद्धाच्या डोक्याला २५ हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह असलेल्या ओव्हरहेड तारांचा स्पर्श होऊन काही सेकंदातच त्या व्यक्तीचा जागीच कोळसा झाला. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ज्या रेल्वे डब्यावर हा अपघात घडला त्यात पेट्रोल-डिझेलची वाहतूक होते.कुणाच्या ध्यानी-मनीही येणार नाही अशा वेळेस संबंधित व्यक्ती रेल्वे डब्यावर चढून दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडही केली; मात्र काही उपयोग झाला नाही.
घटना घडल्यानंतर रेल्वे पोलिस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतिफ शहा यांनी तपासणी करून मृत घोषित केले. रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मृताची ओळख पटविण्याचे व नजीकच्या जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस कर्मचारी सचिनकुमार भावसार करीत आहेत.
थोडक्यात मोठा अनर्थ टळला
रेल्वेस्थानकावर उभ्या मालगाडीच्या पन्नास ते साठ डब्यांमधून अतिज्वलनशील पेट्रोलची वाहतूक करण्यात येते. अपघात घडला त्यावेळेस अतिउच्च विद्युत दाब असलेल्या तारांचा स्पर्श होत मोठा आवाज झाला. या वेळी डब्यातून इंधन लिकेज असते, तर या डब्याचाच स्फोट घडून रेल्वेस्थानक परिसर बेचिराख झाले असते, असे तज्ज्ञाचे मत आहे.