जळगाव : अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत एसडीआरएफ बचाव पथकाची बोट उलटून तीन जवान शहिद झाले. यात जळगाव जिल्ह्यातील पांढरद ता. भडगाव येथील एका जवानाचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात अकोले सुगाव बुद्रूक येथील प्रवरा नदीपात्रात दोन मुले बुडाल्याचा संदेश प्राप्त झाला होता.
या बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी २२ मे रोजी सायंकाळी १९.४४ वाजेच्या मंत्रालय, शासन आदेशानुसार एसडीआरएफ धुळे बल पथक क्र.२ चे तीन जवान रवाना करण्यात आले होते. प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोन जणांचा शोध बचाव करण्यासाठी एसडीआरएफचे बचाव पथक आणि स्थानिक असे सहाजण बोटीच्या माध्यमातून गेले होते.
मात्र अचानक २३ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शोध व बचाव कार्य करतेवेळी नदीपात्रात भोवऱ्यात अडकून बोट उलटल्याची दुर्घटना घडली. त्यात धुळे एसडीआरएफ पथकाचे तीन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथील हरिश्चंद्र बानकुळे रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तर बोटीतील अन्य तिघेजण बेपत्ता आहेत.
भडगावचा जवान वैभव वाघ शहिद
भडगाव तालुक्यातील पांढरद येथील पोलीस शिपाई वैभव सुनिल वाघ, गट क्र.८ मुंबई, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे., कोठडी ता. दौंड जि. पुणे. गट क्र.५ दौंड आणि पोलीस शिपाई राहूल गोपिचंद पावरा धुळे गट क्र.६ हे तीन जवान शहिद झाले आहेत. शहिद जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथील परिसरात श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे पार्थीव कुटुंबियांकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलिस निरीक्षक आर. जे. सोनवणे यांनी दिली