Jalgaon News: बदल्यांच्या गोंधळात माहिती अधिकाराच्या सुनावणीस महापालिकेला अपिलीय अधिकारीच मिळेना

जळगाव: अधिका-यांच्या बदल्याच्या गोंधळात माहिती अधिकारातील सुनावणीसाठी अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्त्तत्रच करण्यात आलेली नाही. ज्यांची नियुक्ती केली होती त्या अधिकाऱ्यांकडील पदभार काढत त्यांना दुसरी जबाबदारी दिली. त्यामुळे माहिती अधिकारातील प्रथम सुनावणी कोणी घ्यावी याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत अतिरीक्त आयुक्तांसह उपायुक्त, सहआयुक्तांनीही आम्हाला प्राधिकृत न केल्याने आम्ही सुनावणी घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे असलेला आस्थापना विभागाचा पदभार हा अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे दिला आहे.

त्यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर काम पाहत आहेत. त्यामुळे अभिजीत बाविस्कर यांनी सुनावणी घ्यावी की, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांनी घ्यावी, किंवा तत्कालिन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी ही सुनावणी घ्यावी याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे सध्या आस्थापना विभागाचा पदभार नसल्यामुळे त्यांनी संबधित अपिलावर सुनावणी घेण्यास नकार दिला असून अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत व सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांना देखील आयुक्तांनी प्राधिकृत केले नसत्यामुळे त्यांनी देखील सुनावणी घेण्यास नकार दिला.

आयुक्त डॉ. गायकवाड यांच्याकडून वारंवार अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला असून यामुळे अपिलकर्त्यांचा वेळ वाया गेला असून त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.