Jalgaon News: भरधाव कारच्या धडकेत जखमी तरुणाचा मृत्यू

जळगाव :  भरधाव कारने धडक दिल्याने पायी चालणारा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. रविवार, १० रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हा अपघात  एमआयडीसीतील रेमंड चौफुलीवर झाला होता. उपचार घेत असताना या तरुणाचा सोमवार ११ रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. भुषण पवनकुमार जैन असे मृत तरुणाचे नाव आहे.

भूषण जैन हा मुंबईत एका कंपनीत नोकरी करत होता. काही दिवसापूर्वी तो जळगाव येथे घरी आला होता. रविवारी तो रेमंड चौफुलीवरुन रात्री रस्त्याने पायी चालत जात असताना भरधाव वेगातील कारने त्याला धडक दिल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला स्थानिक नागरिकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यानंतर कुटुंबिय तसेच नातेवाईकांनी अधिकच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविले.  अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असताना ११ रोजी सकाळी ९ वाजता त्याची प्रकृती गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.