---Advertisement---
जळगाव : गॅस सिलेंडर फुटून आगीने रौद्ररुप धारण करीत पाच घरांना विळख्यात घेत संसाराची राखरांगोळी केली. मन्यास्खेडा (ता. जळगाव) येथे सोमवार, १८ रोजी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास घडली. पार्टिशनची घरे असल्याने आग झपाट्याने वाढली. या घरासमोर वीज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर होता. गॅस सिलेंडर फुटले की ट्रान्सफॉर्मरमधून ठिणगी उडाल्याने आग लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही.
मनपाच्या अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझविली. याठिकाणी राहणारे सर्व कुटुंबातील सदस्य हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अचानक घराला आग लागली. पार्टिशन घरे असल्याने आग झपाट्याने वाढत पाच घरांना विळखा घातला. या आगीत धान्य, पैसे, संसारोपयोगी वस्तू, कपडे यासकट सारे काही जळून नष्ट झाल्याने ही कुटुंबे उघड्यावर आली. अग्निशमन विभागाला खबर मिळताच दोन बंब घटनास्थळी रवाना झाले.
पथकातील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे मदत कार्य तत्काळ सुरु केले. ही आग एका बंबाच्या मदतीने आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र पाच कुटुंबियांचा संसार त्यात जळून राख झाला. अग्नीशमन अधिक्षक शशीकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालक निवांत इंगळे, भूषण पाटील, संजय तायडे, नितीन ससाणे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले