जळगाव: जळगाव शहराला गेल्या महिन्याभरापासून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु याबाबत नागरिकांच्या तक्रारीत वाढ होण्यासह माध्यमातून बातम्याही प्रसिध्द होऊ लागल्यात. त्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला याची दखल घ्यावी लागली. महिन्याभरानंतर पाणी पुखठा विभागाने जाहिर निवेदन काढत पिवळसर पाणी पिण्यास योग्य असल्याचे सांगीतले. का होतेय पाणी पिवळे शहराला वाघुर धरणातून पाणी पुरवठा होत आहे. सध्या वाघुर धरणात सद्यस्थितीत ७२ टक्के पाणी साठा आहे. सध्याचे तापमान हे ४० अंशापेक्षाही जास्त आहे.
त्यामुळे धरणातील पाण्याच्या तळापर्यंत सुर्यकिरणे पोहचत असल्याने पाण्यातील शेवाळ व पानवेलींची पाने ही सडून त्याचा पिवळसर रंग व वास हा त्या पाण्यात येतो. जलशुध्दीकरण केंद्रात हे पाणी शुध्द करूनही बारीक पिवळसर शेवाळ हे फिल्टर न होताच ते जलवाहीनीद्वारे नागरीकांना मिळत असल्याचे महापालिकेने सांगितले.
पाणी पिण्यास योग्य
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आलेल्या तकारीनुसार अजिंठा हाऊसिंग सोसायटी, गणेशपुरी, मेहरुण भाग, सालार नगर सावित्री नगर, श्रीकृष्ण नगर, निमखेडी शिवधाम मंदिर परिसर, आव्हाणे शिवार, चंदूअण्णा नगर, साईनगर, शिवशक्ती नगर व निवृत्ती नगर या भागातून नळांचे २५ पाण्याचे नमुने घेऊन महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा व जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा जळगाव यांचेकडे तपासणीसाठी ५ व १२ एप्रिल २४ रोजी पाठवले होते. त्यांच्याकडून १५ व १६ एप्रिल रोजी तपासणी अहवाल मनपास प्राप्त झाला. त्यानुसार पिवळसर पाणी पिण्यास योग्य असल्याचे आयुक्त पल्लवी भागवत यांनी कळविले आहे.
पाणी उकळून प्यावे
शहरात सध्या पिवळसर पाणी पुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यास योग्य असले तरी खबरदारी म्हणून हे पाणी उकळून व थंड करून प्यावे. जेणेकरून पोटाचे किंवा अतिसारासारखे त्रास होणार नाही. तसेच तापमानही जास्त असल्याने उन्हात जास्त वेळ काम करणे किंवा फिरू नये. यामुळेही शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. घराबाहेर असताना बर्फ खाणे, बर्फर युक्त सरबत, बर्फ युक्त ऊसाच्या रसाचे सेवन करू नका. सध्या लगीन सराई असल्याने कोठेलेही पाणी पिऊ नका. घरून पाण्याची बाटली घेवून जावी. किंवा सिलबंद पाण्याची बाटलीची एक्सपायरी डेट पाहून घ्यावी. ही ही बाटली ब लगेच फेकून न देता त्यात थोडे पाणी शिल्लक ठेवावे. काही त्रास झाल्यास या पाण्याची तपासणी करता येईल.
– डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा जळगाव