Jalgaon News: मे अखेर महापालिकेतून ३० कर्मचारी होणार सेवानिवृत्त

जळगाव : महापालिकेत एकीकडे अनुकंपा तत्वासह कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची भरती केली जात असताना दुसरीकडे मात्र विविध विभागातील व पदांवरील कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. ३१ मे २०२४ रोजी महापालिकेतून ३० जण सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कोरम अपूर्ण राहणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये ५ कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. आता ३१ मे रोजी तब्बल ३० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. यात लिपीक ५, मजूर ९, मिस्तरी १, शिपाई १, नाकेदार १, चौकीदार २, पंप ऑपरेटर १, व्हॉलमन १, वायरमन १, वाहन चालक ३, आया १, लॅब टेक्नीशियन १, इलेक्ट्रिशियन १, फिटर १, परिचारिका १ असे एकूण ३० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.

यातील नाकेदार व चौकीदार ही पदे नव्या आकृतीबंधानुसार व्यपगत होणार आहेत. या पदांवर आता नव्याने भरती होणार नाही. राज्य शासनाने जकात बंद केल्याने जकात नाक्यांवर असलेले नाकेदार व चौकीदार ही पदे आता जकात नसल्याने व्यपगत झालेली आहेत. महापालिकेने शासनाकडे सादर केलेल्या नव्या आकृतीबंधानुसार काही पदे आता व्यपगत होणार आहेत. सध्या या पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. ते जेव्हा सेवानिवृत्त होतील तेव्हा ही पदे कायमस्वरूपी व्यपगत होणार आहेत.

कामाचा ताण वाढणार ३१ मे रोजी एकाचवेळी ३० कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने त्याच्याकडे असलेल्या कामाचा पदभार त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. पुढील वर्षापर्यंत महापालिकेतील विविध विभाग प्रमुखही सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदांवर आता महापालिका व शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे.