Jalgaon News: मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन तरुणाने उचलेले टोकाचे पाऊल

जळगाव: लग्नाचा पहिला वाढदिवसाचा दिवस आणि तसे मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन सकाळी आनंदात असलेल्या कुणाल प्रकाश सूर्यवंशी या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, १२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल सूर्यवंशी हा अभियंता असून एका सिमेंट कंपनीत तो कार्यरत होता. व्दारकानगर येथे टू रुम किचनचे घर भाड्याने घेतले होते. याठिकाणी त्यांच्या पत्नी हेमलता तसेच पाच महिन्याची बालिका होती. आज दुपारी ते नेहमीप्रमाणे घरी आले. पुढच्या रुममध्ये त्यांच्या पत्नी व त्यांची पाच महिन्याची बालिका असे बसले होते. आतील रुममध्ये कुणाल हे आराम करत होते. याचवेळी त्यांनी गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, त्यांच्या पत्नी या बालिकेस झोपविल्यानंतर आतल्या रुममध्ये गेल्या असता त्यांना ही क्लेशदायी घटना समोर दिसली. त्यांनी आरडाओरड केल्याने गल्लीतील लोकांनी धाव घेतली. तालुका पोलीस ठाण्याचे अनिल फेगडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बेशुध्दावस्थेतील कुणाल यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.