जळगाव : तिसऱ्या मजल्यावरील दागिन्यांचे दुकान व दुसऱ्या मजल्यावर सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बंद दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तब्बल १४ लाख ५९ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. शहरातील मारोतीपेठेतील सीताराम प्लाझा येथे ही घटना २६ जानेवारी रोजी रात्री घडली.
या धाडसी चोरीने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. सचिन प्रभाकर सोनार (३८) हे रामपेठ येथे राहतात. त्यांचे सीताराम प्लाझामध्ये तिसऱ्या मजल्यावर श्री अलंकार नावाचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचे नुर पॉलीश छिलाई सेंटर नावाचे सोन्याच्या दागिनांना पॉलिश करण्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री सोनार यांनी दालने कुलूप लावून बंद केले. आणि ते घरी निघून गेले. २६ च्या मध्यरात्रीनंतर चोरटे सीताराम प्लाझाम ध्ये आले. या दोन्ही दागिन्यांच्या बंद दुकानाचे लोखंडी गेट व लोखंडी चैनल गेटचे कुलूप कापले. मग चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. आतमध्ये दुकानातील काउंटर टेबलचे ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे रॉ मटेरियल व दागिने घेत चोरटे पसार झाले. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत ही घटना घडली.
माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावीत तसेच शनीपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि.आर. टी.धारबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज प्राप्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपासला गती दिली.