Jalgaon News : देशात युद्धजन्य परिस्थिती असून सैनिकांना रक्तपुरवठा करण्याच्या नावाखाली रेडक्रॉस सोसायटीमार्फत सामाजिक संस्थांवर दबाव आणून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, रक्तसंकलन करून त्यातून आर्थिक लाभ घेतला जात असल्याची माहिती काही संस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर ‘अंतर्गत भारताने पाकिस्तानवर हल्ला करून भारतीय सैन्याची ताकद दाखवून दिली. एकीकडे भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र या सैन्याच्या नावाखाली युद्धजन्य परिस्थितीचे कारण पुढे करून जळगाव जिल्ह्यात रक्तदान शिबिरांसाठी सामाजिक संस्थांना वेठीस धरले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
रेडक्रॉसकडून पालकमंत्र्यांच्या आवाहनाचा वापर
देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी रक्तदान शिबिरास प्रतिसाद द्यावा, अशा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाचा वापर करून रेडक्रॉस सोसायटीमार्फत सर्रास रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. प्रत्यक्षात पालकमंत्री पाटील यांनी कुठेही तसे आवाहन केल्याचे ऐकीवात नाही. असे असताना रेडक्रॉसकडून त्याचा गैरवापर होत असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.
- बॉर्डरलगतच्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही तणाव आहे. त्यामुळे भविष्यात रक्ताची गरज भरून काढता यावी यासाठी तयारी म्हणून शिबिरे घेतली जात आहेत. संकलित रक्ताचा साठा हा अत्याधुनिक लॅबमध्ये होत असल्याकारणाने त्याची किंमत अधिक आहे. देशभरातील रेडक्रॉस सोसायट्यांमार्फत सोसार होणाऱ्या रक्तपुरवठ्याच्या दरांबाबत विचार विनिमय सुरू आहे. शिबिरे घेणे हे ऐच्छिक असून सामाजिक गरज लक्षात घेता जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असल्याने विशेष आदेशाची आवश्यकता नसते. – – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.
- देशात कुठेही सैनिकांकडून किंवा सरकारकडून रक्ताची अद्याप तरी मागणी नाही किंवा तसे काही आदेशही नाहीत. पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजलीपर नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन गोळवलकर रक्तपेढीदेखील करीत आहे. परंतु केवळ एकाच सोसायटीमार्फत हे शिबिर राबविले जाण्यावर आक्षेप आहे. अगदी मुंबई, पुण्यातूनही माहिती घेतली असता रक्ताची मागणी सध्यातरी नाही.
भानुदास येवलेकर, समन्वयक, गोळवलकर स्क्तपेढी.