---Advertisement---

Jalgaon News : धरण उशाला, कोरड घशाला! जिल्ह्यात पाणीटंचाई नैसर्गिक की मानवनिर्मित हा प्रश्न अनुत्तरितच

---Advertisement---

Jalgaon News : जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर असे तीन मोठे तर १४ मध्यम प्रकल्पांसह ९६ लघु प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत या सर्व प्रकल्पांपैकी बोरी आणि भोकरबारी या दोन प्रकल्पांमध्ये मृतसाठा असून अग्नावती, हिवरा आणि मन्याड या प्रकल्पांचीदेखील मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू आहे. तर अन्य प्रकल्पांवर विविध तालुक्यांमधील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात हतनूर प्रकल्पावर अमळनेर, धरणगाव, चोपडा, रावेर व भुसावळसह अन्य तालुक्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. केंद्र व राज्य शासनाच्या घरघर जल, जलजीवन मिशनसारख्या अनेक पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यात आली असली तरी भुसावळ शहरात सहा, अमळनेर आठ ते दहा दिवस, पारोळा दहा ते बारा दिवस, धरणगाव पंधरा ते वीस दिवस, चाळीसगाव ५ दिवस, भडगाव ५ ते ७ दिवस, पाचोरा १० ते १२ दिवसांनी पाणी मिळते.

सर्वच तालुक्यात पाणीपुरवठ्याची अशी अवस्था आहे. यात पारोळा शहराला विचखेडे-बोरी बंधाऱ्यावरून, धरणगावला तापी नदीपात्रातून, चाळीसगाव शहराला थेट गिरणा प्रकल्पावरून जलवाहिनीद्वारे, तर भडगाव आणि पाचोरा शहरांना गिरणा-गिरड केटीवेअरवरून स्थानिक नदीपात्रात बंधाऱ्यावरून पाणीपुरवठा केला जात आहे. पाचोरा शहरासाठी बहुळा प्रकल्पावरूनदेखील साडेसहा कोटी रुपये खर्चाची जलवाहिनी आहे. ती आज बंद अवस्थेत असल्यासारखीच असून जिल्हाभरात
१३ गावांसाठी १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्याचे पाणीवाले बाबा अर्थात जळगावच्या पालकमंत्र्यांच्याच जिल्ह्यात ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशा परिस्थितीमुळे जिल्ह्यात पाणीटंचाई नैसर्गिक की मानवनिर्मित असा प्रश्न अनुत्तरित असत्याचेच दिसून येत आहे.

नगर परिषदांसह पाणी योजनांकडून आवर्तनाची मागणी

जळगाव, धरणगाव, भुसावळ, यावल आणि रावेर हे तालुके मात्र टँकरमुक्त आहेत. पण जळगाव आणि पाचोरा शहरात पाणीटंचाईच्या झळा जाणवून येत आहेत. पाचोरा, भडगाव नगरपालिकेसह चाळीसगाव एमआयडीसी प्रशासनाकडून गिरणेच्या आवर्तनाची म ागणी करण्यात आली आहे. मात्र भडगाव शहरानजीक बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने ते पूर्ण होईपर्यंत किमान ८ ते १० दिवस तरी आवर्तन सोडता येणार नाही. त्यामुळे भडगाव व पाचोरा शहरवासियांना काही दिवस बंधाऱ्यांच्या विहिरीतील उपलब्ध जलसाठ्यावरच तहान भागवावी लागणार आहे.

पाचोरावासियांना १२, तर भडगावकरांना सात दिवसाआड पाणीपुरवठा

सद्यःस्थितीत भडगाव शहात पाच ते सात दिवसाआड तर पाचोरा शहरात तब्बल १० ते १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. तर ग्रामीण भागात सद्यस्थितीत १३ गावात १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर ४४ गावांसाठी ४५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जळगाव तालुक्यात एका गावासाठी नवीन विंधन विहीर घेण्यात आली आहे.

भडगाव बंधाऱ्याच्या बांधकामामुळे ‘गिरणा’चे आवर्तन लांबणीवर

भडगाव शहरात तत्कालीन ग्रामपंचायत काळात २००२ मध्ये सरपंच राजेंद्र महादू पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास पाटील तथा पंचायत समिती सदस्य दत्तात्रय पवार यांच्या कार्यकाळात मातीचा कच्चा बंधारा बांधकाम मंजूर करण्यात आले होते. या बंधाऱ्याचे दोन ते तीन वेळा पुनरुज्जीवन करण्यात येऊन २००५-०६ दरम्यान अर्धा मातीचा व अर्धा सिमेंटचा सांडवा असा बंधारा होता. सद्यस्थितीत पक्क्या केटीवेअर बंधाऱ्याता भडगाव नगरपरिषद अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. हे बांधकाम अंतिम टप्प्यात असून भडगाव येथील बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच गिरणेचे चौथे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

अमळनेर तालुक्यात सर्वाधिक अवर्षण प्रवण क्षेत्र

चाळीसगावखालोखाल अमळनेर तालुक्यातदेखील तीव्र पाणीटंचाईचे चटके बसत असून चार गावांसाठी सहा टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अमळनेर तालुक्यातून पांझरा आणि बोरी या नद्या वाहत असल्या तरी केवळ चार ते सहा महिनेच नदीपात्रात पाणी राहत असल्याने इतर वेळेस पाण्याचे दुर्भिक्ष असते.

केटीवेअरमुळे पाणीपुरवठा समस्येचे कायमस्वरूपी निवारण

भडगाव शहरासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावरून अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पक्का बंधाऱ्याचे बांधकाम मंजूर आहे. यात केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ४५ आणि ‘भडगाव नगर परिषद ५ टक्के यानुसार २० कोटी रुपये अंदाजपत्रकीय रकमेनुसार केटी वेअरचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नवीन जलवाहिन्यादेखील टाकण्यात आल्या आहेत आणि आवर्तन सोडण्यासंदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत पाच दिवसांनंतर शहरात पाणीपुरवठा होत असून या केटीवेअरमुळे भडगाव शहराची पाणीटंचाई समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे.
रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद भडगाव.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment