Jalgaon News : राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाबाबत आपल्याशी बाेलणी केली नाही, आम्हीही त्यांच्याशी बाेलणी केलेली नाही. त्याबाबतचा विषय सद्या बंदच आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी व्यक्त केले. ते जळगाव येथे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित भाजपच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय कार्यशाळेनिमित्त जळगावात आले असता पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
पुढे बोलताना बाेलतांना ते म्हणाले, राज्यात भाजप सदस्य नाेंदणीत उत्तर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर राहणार आहे. राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण याेजनेसह इतर याेजनावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यावर बाेलतांना बावनकुळे म्हणाले, जनहिताच्या या याेजना आहेत, लाडकी बहिण याेजनाही महिलांना सक्षम करणारी याेजना आहे, ही याेजना चालूच ठेवण्यासाठी आम्ही न्यायालयात भक्कम पुरावा देवून बाजू मांडणार आहाेत, असेही ते म्हणाले.
खडसेंच्या प्रवेशाचा विषय बंद
राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भाजपच्या प्रवेशाबाबत जाेरदार चर्चा सुरू हाेत्या. त्या बाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, खडसेंच्या प्रवेशासाठी आम्ही त्यांच्याशी काेणतीही बाेलणी केलेली नाही, त्यांनीही आमच्याशी बाेलणी केलेली नाही.सद्या तरी हा विषय बंदच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.