Jalgaon News : व्यवस्थेचा बोजवारा… गॅस पंप सुविधेचा जळगावात अभाव

जळगाव, आर. आर. पाटील : गॅसकिट बसविण्याला परवानगी दिली. त्यानंतर वाहनमालकांनी गॅस प्रणालीची वाहने कार्यान्वित केली. या वाहनांमध्ये गॅस भरण्याची व्यवस्था कार्यरत ठेवण्याची जबाबदारी यंत्रणेची होती. राज्यात अनेक शहरांमध्ये गॅस पंपांची सोय उपलब्ध आहे. जळगाव शहरात मात्र एकही गॅस पंप सुरू नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. व्यवस्थेतील या उणिवेकडे कानाडोळा करता येणार नाही. शहरात कोर्ट चौकाकडून गणेश कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर एचपीच्या पंपावर गॅस पंप होता. मात्र वर्षभरापासून हा पंप बंद आहे. कुसुंब्यांपासून पुढे औरंगाबाद मार्गावरील गॅस पंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे.

सद्यस्थितीला नशिराबाद येथे गॅस पंप असून त्या ठिकाणी वाहनात गॅस भरला जात आहे. त्याठिकाणी वाहनांच्या रांगा असतात. जळगाव शहरात वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी पंपच नाही, हे वास्तव आहे. व्यवस्थेतील या अभावाने अवैध रिफिलिंग सेंटरकडे वाहनधारक धाव घेऊ लागले असल्याचे चित्र समोर आले आहे.. वर्षभरापूर्वी शहरात एचपीचा गॅस पंप कार्यान्वित होता. तसेच कुसुंब्यानजीकच्यचा गॅस पंपावरही वाहनांमध्ये गॅस भरण्याची सुविधा कार्यान्वित होती. मात्र कालांतराने हे दोन्ही पंप बंद पडले. त्यानंतर शहरात गॅस भरण्याची अधिकृत अशी सोयच राहिली नाही. गॅस पंप बंद पडण्यामागची कारणे काहीही असोत. मात्र वाहनांना पर्यायी गॅस पुरवठा करण्याची अधिकृत यंत्रणा शहरात नसल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. यातून अवैधरीत्या गॅस सेंटरही बोकाळले.

यंत्रणेतील उणिवा, दुर्लक्ष, व्यवस्थेचा अभाव अशा कारणांनी रिफिलिंग सेंटरला बळ मिळाले आणि गॅस वाहनधारकांच्या गरजेची पूर्ती होऊ लागली. गॅस वाहनांसाठी शहरात अधिकृत गॅस पंप व्यवस्था कार्यान्वित करणे, ही काळाची गरज आहे. यंत्रणेने यासाठी कार्यतत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या कृतीतून अवैध रिफिलिंग सेंटर्सना पायबंद बसेल. वाहनधारकांनाही सुरक्षित गॅस भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच अप्रिय अशा जीवित व आर्थिक हानीच्या दुर्घटना टाळण्यासही मदत होईल.


उदरनिर्वाह वाहनावरच
नशिराबाद येथे गॅस पंप कार्यान्वित आहे. परंतु तो जळगाव शहरापासून लांब आहे. अनेक ऑटो रिक्षा, काही चारचाकी वाहनांना गॅसकिट बसवून घेतले आहे. अनेकांचा या वाहनांच्या चाकावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. वाहन चालविण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही, असे अनेक गॅस वाहनधारकांनी म्हणणे मांडले. वाहनांना ज्यापद्धतीने मान्यता दिली. त्यानुसार शहरात तंत्रशुद्ध पद्धतीने गॅस भरण्याचा पंपही उपलब्ध करून देणे ही यंत्रणेची जबाबदारी बनते. मात्र अशी व्यवस्था कायम कार्यरत ठेवण्यात प्रशासनाला स्वारस्य वाटले नाही, असा सूर गॅस वाहनधारकांनी लावला. ही गरज लक्षात घेऊन काही लोकांनी रिफिलिंग सेंटर सुरू करून धंदा मांडला. गॅस भरण्याची पर्यायी व्यवस्था त्यामुळे कार्यान्वित झाली. अशा अनधिकृत सेंटर्सना कोणतीही मान्यता नाही. ते गैर आहेत, हे माहीत असूनही गरजेतून वाहनधारक या सेंटरकडे जाऊ लागले. ही वेळ या वाहनधारकांवर कोणामुळे आली ? याचा विचार होणे आवश्यक आहे.

रिफिलिंग सेंटर्सला घरगुती सिलेंडरचा पुरवठा
शहरातील गॅस पंप बंद पडल्यामुळे वाहनांमध्ये गॅस भरण्याची समस्या वाहनधारकांसमोर निर्माण झालेली आहे. अनेक चालकांचा या वाहनाच्या माध्यमातून कुटुंबाचा कुटु उदरनिर्वाह चालतो आहे. प्रामुख्याने या वाहनावर कुटुंबाची भिस्त असलेल्या चालक-मालकांवर बेरोजगार होण्याची आफत येण्याची भीती व्यक्त होऊ लागली. याचाच गैरफायदा म्हणा किंवा अवैध व्यवसाय म्हणा वा गरज म्हणून रिफिलिंग सेंटर्सकडे लोक वळू लागले. घरगुती गॅसमधून अवैधरीत्या वाहनात गॅस भरण्याची कृती समर्थनीय मुळीच नाही. रिफिलिंग सेंटर ही सुरक्षित अथवा वैधही नाहीत. मात्र या सेंटरर्सला यंत्रणेच्या माध्यमातूनच घरगुती सिलिंडरचा पुरवठा कोणत्या आधारावर होतो? हाही प्रश्न अनाकलनीय आहे.