Jalgaon News : जळगाव आयकर विभागाने जिल्ह्यात ऐतिहासीक कामगिरी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही कामगिरी करण्यात आली आहे. जळगाव आणि नाशिक येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची करचुकवेगिरी (टीडीएस कर) समोर आणली आहे. या करचुकवेगिरीतून शासनाची सुमारे 11 ते 12 कोटींत फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
सामान्यतः एखादी व्यक्ती किंवा खासगी संस्थांनी करचुकवेगिरी केल्याचे आपण ऐकतो; पण जळगावात शासकीय संस्था असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेच शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शासकीय संस्थेनेच शासनाला चुना लावल्याचा हा दुर्मिळ प्रकार सध्या चर्चिला जात आहे.
महाविद्यालय प्रशासनाने 2023 ते 2025 च्या दरम्यान ही करचुकवेगिरी केली असून, यातून शासनाची सुमारे 11 ते 12 कोटी रुपयांत फसवणूक झाली आहे. हा प्रकार लक्षात घेता, जळगाव आणि नाशिक आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (21 जानेवारी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छापा टाकला होता. हे तपास पथक सकाळी दहाच्या सुमारास महाविद्यालयात दाखल होत रात्री उशिरापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठाण मांडून होते. छाप्यात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने 448 कोटींची देयके, तर आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयाने 14.42 कोटींची देयके एचएससीसी इंडिया लिमिटेड या कंपनीला अदा केली आहेत. या देयकांवर महाविद्यालय प्रशासनाने कुठल्याच प्रकारचा टीडीएस कापला नाही. ही कपात न केल्याने शासनाचे सुमारे 11 ते 12 कोटींचे नुकसान झाले आहे.
गुन्हा दाखल होण्याची शक्यता
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या टीडीएस घोळ प्रकरणी नाशिक आणि जळगाव आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत महाविद्यालयाकडून शासनाची सुमारे 11 ते 12 कोटी रुपयांत फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यादृष्टीने पथक आहवाल तयार करून पुणे येथील प्राप्तिकर आयुक्तांकडे पाठवीत याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.