Jalgaon News : निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेंना अखेर अटक

जळगाव : एलसीबीचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार हे तब्बल दीड वर्षानंतर सोमवार १५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले. दुपारी चार वाजता त्यांना न्यायाधीश निवासस्थानी हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तद्नंतर त्यांची जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बंदोबस्तामध्ये रवानगी केली. ]\+
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान त्यांनी केले होते. ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे समाजमनाने संतप्त भावना व्यक्त केल्या. याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १५ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक बकाले यांचे निलंबन करुन त्यांना नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले. ते हजर न होता फरार झाले.

जामीनसाठी त्यांनी जिल्हा न्यायालय, खंडपीठात धाव घेतली. मात्र त्यांचे अर्ज नामंजूर झाले. दुसरीकडे समाजमनाचा रोष वाढत गेला. दुसरीकडे त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्यासंदर्भात कायदेशिररित्या सुरुवात केली होती. अखेर १५ रोजी ते पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजता त्यांना अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणी करुन  त्यांनी उपपोलीस अधिक्षक संदीप गावीत यांनी न्यायालयात हजर करण्याच्या कामाला गती दिली. न्यायालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. मात्र छावा तसेच मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी न्यायालयात गर्दी केल्याने दुपारी ४ वाजता त्यांना न्या. जे. एस. केळकर यांच्या निवासस्थानी उपअधिक्षक गावीत यांनी हजर केले.

सरकार पक्षातर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी बाजू मांडली. मराठा समाजातर्फे अॅड. गोपाळ जळमकर तर बचाव पक्षातर्फे अॅड. सुरज जहाँगीर यांनी युक्तीवाद केला. तपासाधिकारी यांनीही म्हणणे मांडले. सत्र न्यायालयाने २६ सप्टेंबर २०२२ रोजी बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाने २१ डिसेंबर २०२३ रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कर्तव्य बजावताना संशयिताने अंत्यत बेजबाबदारपणे वक्तव्य करुन मराठा समाजाविषयी व इतर समाजात व्देष निर्माण होऊन तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. अनेक ठिकाणी निदर्शने मोर्चे निघून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. गुन्ह्याचा तपासकामी पोलीस कोठडी मिळावी, अशी बाजू सरकार पक्षातर्फे मांडण्यात आली.