Jalgaon News : क्रांतिवीरांकडून फितुरांना मारण्याचा प्रयत्न अपयशी, ‘२१ फेब्रुवारी’ जळगावकरांच्या कायम राहील स्मरणात

#image_title

जळगाव : शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्या खटल्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी फितूर झालेल्या दोघांवर क्रांतिकारकांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला, नंतर १० क्रांतिकारकांना शिक्षा झाली. ही घटना ‘२१ फेब्रुवारी १९३०’ रोजी जळगाव शहरात घडली होती. हा प्रसंग जळगावकरांच्या कायम स्मरणात राहील, अशी आठवण जळगाव येथील मुंदडा हायस्कूलमधील इतिहास विषयाचे शिक्षक-अभ्यासक जगदीश रवींद्र बियाणी सांगतात.

जगदीश बियाणी यांनी पुढे सांगितले की, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांचे अपरिचित सोबती व २१ फेब्रुवारी १९३० हा दिवस जळगाव शहरात क्रांतिकार्यासाठी सुवर्ण अक्षरांनी अंकित झालेला आहे. १९२३ ते १९३१ साधारण साडेआठ वर्षांचा काळ हिंदुस्थान प्रजातंत्र सेनेचे कार्यकर्ते, महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांच्या क्रांतिकार्यान अजरामर झालेला आहे. याच संघटनेचे कार्य महाराष्ट्रातील जळगावपर्यंत येऊन पोहोचले.

इंग्रजांना मदत करणाऱ्या दोघा गद्दारांची जळगावात साक्ष

जळगाव येथील जेठमल सारस्वत, मदनलाल उपाध्ये, आनंदराम बाहेती, देवकीनंदन सारस्वत, मीर अकबर मीर शुक्रल्ला, अंबू पोळ, दाजी जोशी, व्यंकटेश मोडक, कस्तुरचंद राका, रतनलाल उपाध्ये या १० क्रांतिकारकांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फासावर लटकवण्यासाठी फितूर होऊन इंग्रजांना मदत करणारे गद्दार जयगोपाल आणि फणिंद्र घोष यांची साक्ष जळगाव सेशन कोर्टात सुरू होती; तेव्हा भगवानदास माहौर आणि सदाशिवराव मलकापूरकर यांना चंद्रशेखर आझाद यांनी शंकरराव मलकापूरकर आणि ॲड. धुळेकर यांच्या माध्यमातून आझाद यांचे अत्यंत प्रिय मावजर पिस्तोल जेवणाच्या डब्यातून देशभक्त जेठमलजी सारस्वत आणि सहकारी यांच्यामार्फत पुरविली होती. दुर्दैवाने फितूर जयगोपाल आणि फणिंद्र घोष गोळीबारात थोडक्यात बचावले आणि नंतर दगडफेक व जाळपोळीच्या तसेच लाठ्याकाठ्यांच्या हल्ल्यातूनही ब्रिटिश पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. चंद्रशेखर आझाद यांनी आखलेली योजना सफल होऊ शकली नाही, पण जळगावमधील या क्रांतिवीरांनी केलेला प्रयत्न, तयारी खरोखरच अविस्मरणीय ठरली.

तत्कालिन परिस्थितीत ब्रिटिशांविरुद्ध दंड थोपटणे म्हणजे फाशी अथवा जन्मठेप स्वीकारणे हाच पर्याय होता. पण आपल्या जिवाची, संसाराची पर्वा न करता भारत मातेला गुलामीतून मुक्त करण्यासाठी क्रांतिकार्यात सहभागी झाले. नंतर या घटनेला जबाबदार असणाऱ्या जमावातील ४० लोकांना अटक करण्यात आली व ३० लोकांना नंतर निर्दोष ठरवत सोडून दिले. उर्वरित १० क्रांतिकारी लोकांवर खटला भरण्यात आला. पुढे बापूसाहेब चित्रे आणि ॲड. भैयासाहेब सोनाळकर यांनी देशभक्त जेठमलजी सारस्वत आणि सहकाऱ्यांसाठी वकील पत्र घेऊन खटला लढवला. यात सहा महिन्यांची शिक्षा जळगावमधील क्रांतिवीरांना ठोठावण्यात आली व त्यांची रवानगी जळगाव येथील तुरुंगात कच्चे कैदी म्हणून करण्यात आली. साम्राज्यवाद मुर्दाबाद, इंकलाब जिंदाबाद, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

संघर्षशील स्वतंत्रता, गुलामी से कहीं बेहतर है….

तत्कालीन परिस्थितीत ब्रिटिश सरकारच्या गुलामीविरुद्ध क्रांतीची मशाल तेवत ठेवणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यातील या नायकांना विनम्र अभिवादन.