जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे यंदाही कान्हदेशचे सांस्कृतिक वैभव श्रीराम रथोत्सव साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सलग अकरा दिवस चालणारा श्रीरामरथ वहनोत्सव शनिवार २ नोव्हेंबर अर्थात बलिप्रतिदेपासून सुरू झाला आहे. मागील 152 वर्षे अव्याहतपणे होणारा हा श्रीराम स्थोत्सव यंदाही उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मातील अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून सदगुरु श्री संत अप्पा महाराज यांनी शके 1794 (सन १८७२) मध्ये सुरु केलेला हा श्रीराम मंदिर संस्थानचा सर्वोच्य मानबिंदू असलेला श्रीराम रथोत्सव यंदा 152 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
श्रीराम स्थोत्सवापूर्वी शनिवार, 2 नोव्हेंबरपासून वहनोत्सवास प्रारंभ झाला आहे. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या पावन दिनी साजरा होणारा राज्यातील एकमेव असा श्रीराम रथोत्सव आहे.
या रथोत्सवाच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक यानिमित्त जळगावला येत असतात. परंपरेप्रमाणे कार्तिक शु. प्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मंगळवार 12 नोव्हेंबर (कार्तिकी प्रबोधिनी एकादशी) दिनी श्रीराम स्थयात्रा काढण्यात येणार येईल.
श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो. वहनोत्सवात जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन- भारूड, पानसुपारीचा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती विराजमान असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणिमात्रांचेही ऋण मानते. त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जात आहे. यात सिंह, सूर्य, घोडा, हत्ती, शेषनाग, चंद्र, मोर, सरस्वती, गरुड, मारुती अशी दहा दिवस वहने निघतात. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाने सांगता होत असते. यापार्श्वभूमीवर जळगावनगरीत पंधरा दिवसांचा दीपोत्सव व आनंदोत्सव साजरा होत असतो.
अशी आहे आख्यायिका
श्रीराम मंदिर संस्थानचे प्रथम गादिपती मूळ सत्पुरुष श्री आप्पा महाराज हे मेहरूण तलावाजवळ ध्यानस्थ बसलेले असताना, त्यांना त्या अवस्थेत साक्षात संत शिरोमणी मुक्ताबाईचा साक्षात्कार झाला. त्यांनी दृष्टान्त देऊन वहन व रथोत्सवाची प्रेरणा आप्पा महाराजांना दिली. त्या वर्षापासून म्हणजे इसवी सन १८७२ पासून आजतागायत १५२ वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा रथोत्सव अव्याहतपणे सुरू आहे.
कार्तिकी शुद्ध एकादशीला रथाची गाव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्री सवाद्य रथावरील देव उतरवून पुनश्च मंदिरात नेले जातात. कार्तिकी शुद्ध द्वादशीला शेवटचे वहन म्हणून कृष्णाची रासक्रीडा असते. गोप-गोपिकांच्या मूर्ती वहनावर सजविल्या जातात. वहनाला ठिकठिकाणी ‘पानसुपारी’ असते. ‘पानसुपारी’ म्हणजे यजमानपद. त्या दिवशी देव आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात. त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. देवांच्या वतीने मंदिराचे महाराज तो सन्मान स्वीकारतात. भजन- भारुड होऊन “पानसुपारी’ची सांगता होते. जळगावच्या रथोत्सवासाठी शहर व परिसरच नव्हे; तर जिल्हाभरातील खेड्यापाड्यांतूनही लोक दर्शनासाठी येतात.
श्रीराम मंदिराचे गादिपती
प्रथम : श्री संत सद्गुरू आप्पा महाराज (1872 ते 1910)
द्वितीय : श्री सद्गुरू वासुदेव महाराज (1910 ते 1937)
तृतीय : श्री सद्गुरू केशव महाराज (1937 ते 1975)
चतुर्थ : श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज (1975 ते 2002)
पाचवे : विद्यमान हरिभक्त परायण श्री मंगेश महाराज