जळगाव : गत आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे जळगावसह राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र आता उत्तरेकडून थंड येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात घट होतांना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत असून, मंगळवारी जळगावात सर्वांत कमी ८ अंश तापमानाची करण्यात आली.
सोमवारी जळगावचा पारा ८.६ अंशावर गेला होता. तर, मंगळवारी त्यात अजून घट झाली आहे. चार दिवसांपासून तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. आगामी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
अजून काही दिवस तापमानात घट
आगामी चार ते पाच दिवसांत जळगाव शहरासह परिसरातील रात्रीच्या तापमानात अजून २ ते ३ अंशांची घट होऊन, पारा ८ ते ९ अंशांवर कायम राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीर व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने घसरून ८ ते ९ अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात विशेष करून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या तापमानात चांगलीच घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
थंडीमुळे रब्बी पिकांना फायदा
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. यामुळे रब्बीच्या हरभरा, गहू या पिकांना थंडीचा चांगलाच फायदा होत असून, शेतशिवारात रब्बीची पिके तरारली आहेत. तसेच रात्रीच्या वेळेस ओस पडत असल्याने कोरडवाहू ज्वारी, मका या पिकांना देखील फायदा होत आहे.