Jalgaon News: प्रवाशांना दिलासा! जळगाव एसटी विभागाला मिळाल्या २० नवीन बसेस

जळगाव : जळगाव एसटी विभागातील बस कमतरता दूर करण्यासाठी मागील काही वर्षांपासून नवीन एसटी बसेसची मागणी करण्यात आली होती. अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव एसटी विभागाच्या मुक्ताईनगर आणि यावल आगाराला प्रत्येकी १० असे एकूण २० नवीन एसटी बसेस मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुविधा युक्त प्रवास करता येणार आहे.

नवीन बीएस-६ बसेसच्या वैशिष्ट्ये

नवीन बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुविधा-संपन्न आहेत. यामध्ये पुढील सुविधा उपलब्ध असतील:

पुश बॅक सीट्स – अधिक आरामदायक प्रवासासाठी
मोबाइल चार्जिंग पॉईंट – प्रवासादरम्यान मोबाइल चार्जिंगची सुविधा
फायर एक्सटिंग्विशर आणि प्रथमोपचार पेटी – आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी
सामान ठेवण्याची सोय – मोठ्या बॅगसाठी स्वतंत्र जागा
आपत्कालीन दरवाजा आणि पॅनिक बटन – प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी

हेही वाचा :  मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ

मार्च अखेरपर्यंत अजून ९० बसेस मिळणार

जळगाव एसटी विभागात एकूण ११ आगार आहेत आणि प्रत्येक आगाराला १० नवीन एसटी बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मुक्ताईनगर व यावल आगाराला प्रत्येकी १० बसेस मिळाल्या आहेत. उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत जळगाव विभागाला मिळणार आहेत.

एसटी महामंडळाचा प्रवास सुधारण्याचा प्रयत्न

एसटी महामंडळाकडून राज्यभरात नवीन बीएस-६ बसेस दाखल केल्या जात आहेत. जळगाव विभागालाही त्याचा लाभ होत असून, भविष्यात आणखी बसेस मिळाल्यास प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळू शकेल.

                                   – दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, जळगाव एसटी विभाग